पावस बसस्थानकातील शौचालय परिसरात दुर्गंधी

पावस : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पावस बसस्थानकामध्ये शौचालयाचे काम करण्यात आले; मात्र साठवण टाकीच्या दुर्दशेमुळे वारंवार शौचालयामधील घाण बाहेर पडत आहे. त्यामुळे परिवहन खात्याला साफसफाई करावी लागत असून प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसस्थानकातील शौचालयाच्या बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून नवीन शौचालय बांधण्यात आले; मात्र साठवण टाकीचे काम योग्य म्हणजेच शोषखड्याच्या माध्यमातून न झाल्यामुळे संपूर्ण टाकी बंदिस्त करण्यात आली; मात्र प्रवाशांसह पावस बाजारपेठेत येणाऱ्यांनीही या शौचालयाचा वापर केल्याने ही टाकी भरली. त्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. ग्रामपंचायतीने शौचालय बांधून दिले असले तरी त्याचे पुढील देखभाल परिवहन खात्याकडे आहे. त्यामुळे त्याच्या स्वच्छतेसाठी एसटी महामंडळाला पैसे मोजावे लागतात. आत्तापर्यंत ५० ते ६० हजार रुपये शौचालयाची साठवण टाकी साफ करण्यासाठी खर्ची पडले.

प्रत्येकवेळी साठवण टाकी साफ करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च परिवहन खात्याला परवडणारा नाही. तेंडुलकर, पावस बसस्थानक प्रमुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 06/Jan/2025