ना. उदय सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत

रत्नागिरी : डीजेचा दणदणाट, ढोलताशाचा गजर आणि जेसीबीमधून फुलांची उधळण करीत रत्नागिरीकरांनी ना. उदय सामंत यांचे स्वागत केले. राज्याच्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच ना. उदय सामंत रत्नागिरीत आल्यावर त्यांचे फुलांची उधळण करीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.

शहरातील मारुती मंदिर परिसराला रविवारी सायंकाळी भगवे स्वरुप प्राप्त झाले होते. भगवे फेटे घातलेले पदाधिकारी लक्षवेधून घेत होते. डिजेचा दणदणाट आणि ढोलताशांचा गजर सुरु होता. दहाहून अधिक जेसीबीमधून फुलांची उधळण ना. सामंत यांच्यावर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन या मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील माळनाका येथे स्व. शामराव पेजे, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ना. सामंत यांनी त्यांना वंदन केले.

मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला जिल्हासंघटक शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष आबा घोसाळे, प्रकाश रसाळ, माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम, गजानन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, युवा तालुकाधिकारी तुषार साळवी, शहर संघटक सौरभ मलुष्टे, अभिजीत दुडये, यांच्यासह माजी नगरसेवक व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मारूती मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. नागरिक ना. सामंतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. यावेळी गाड्यांच्याही लांबच लांब रांगा लागल्या. मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 23-12-2024