गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गासाठी भूसंपादन सुरू

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रामपूर ते चिपळूण शहरातील उक्ताड पर्यंतच्या भूसंपादनाला नुकतीच शिरळ येथून सुरुवात झाली. भूमी अभिलेख खात्यासह राष्ट्रीय महामार्ग अधिकारी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी केली जात आहे. मंगळवारी (ता. २४) कोंढे गावात मोजणी होणार आहे.

चिपळूणपासून गुहागरपर्यंतचा मार्ग सिमेंट काँक्रिटचा केला जाणार आहे. रामपूर ते उक्ताड हा उर्वरित दुसरा टप्पा जागेच्या मोजणीमुळे गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. सुमारे १४ किमीच्या या मार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक वर्षांपूर्वी ७१ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आणि ठेकेदाराची नियुक्तीही केली आहे. मात्र भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे ठेकेदाराने काम सुरू केले नाही. पावसाळा संपला आता निवडणुकीचा हंगामही संपला आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या विषयाला गती मिळाली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून कोंढे, शिरळसह रामपूर, पाचाड, मालघर, रेहेळ, वैजी या गावातील सुमारे अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. शुक्रवारी शिरळ येथून मोजणीला सुरुवात झाली. एकाच गटातील जागेची मोजणी असल्याने ती दोन दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 24/Dec/2024