चिपळूण : कडाक्याची थंडी पडलेली असतानाच सोमवारी (ता. २३) सकाळी शहरभर दाट धुके पसरलेले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये सकाळी नऊपर्यंत अंधारमय वातावरण होते. दृश्यमानतेत कमालीची घट झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत होते.
चिपळुणातील किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके होते. यावर्षीच्या हिवाळी हंगामात कडाक्याच्या थंडीचा अनुभव चिपळूण शहरातील नागरिकांना येत आहे. आधी नोव्हेंबर अखेरीस पाऱ्यामध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर डिसेंबरमध्येदेखील वातावरणातील गारवा टिकून आहे. गेल्या आठवड्यातच यावर्षीच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. सोमवारी (ता. २३) शहरातील बहुतांश भागांमध्ये गडद धुके दाटून आले होते. पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृश्यमानता जवळजवळ शुन्यापर्यंत खालावली होती, तर सकाळी नऊपर्यंत अनेक भागांमध्ये धुक्याची दुलई कायम होती. त्याचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसला. महामार्गावर दृश्यमानता खूपच खालावली होती. त्यामुळे अगदी काही फूट अंतरावरची वाहने दिसेनासी झाली होती. अचानक पडलेल्या गडद धुक्यात सारे काही अदृश्य झाल्याची अनुभूती नागरिकांनी घेतली. सकाळच्या गुलाबी थंडीत ही शहरातील नागरिक चालण्यासाठी बाहेर पडतात. अनेक नागरिक पाग पावर हाऊस, कापसाळ, डीबीजे महाविद्यालय, बहादूर शेख नाका, शिवाजीनगर भागांत चालतात. महामार्गावरून येणारी वाहने सकाळी दिसत नव्हती.
सध्याच्या वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आधीच धुक्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण प्रभावित होत आहे. थंडी वाढली की, सायीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. डॉ. पराग यादव, अलोरे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 24/Dec/2024












