राजापूर : सडा परिसरात आढळणाऱ्या गवताच्या वीस प्रजातींचे संरक्षण

राजापूर : उन्हाळ्यात वणवा लागून मोकळ्या भागातील गवत जळून जाते. त्यामुळे गवताच्या प्रजातीसह सड्यावरील जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. भविष्यात सड्यावरील गवताच्या काही प्रजाती नष्ट होण्याचा धोकाही आहे. सडा परिसरातील जैवविविधतेसह गवताच्या प्रजातींचे संवर्धन करताना त्याचा उपजीविकेसाठी सदुपयोग व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पूजा घाटे, भूषण शिगवण, सारंग बोकील आणि अपर्णा वाटवे यांनी अभ्यास केला आहे. त्या द्वारे कोकणच्या सडा परिसरात आढळणाऱ्या गवताच्या सुमारे वीस प्रजातींचे संरक्षण केले जाणार आहे.

‘बॉम्बे एल्व्हार्यमेंटल अॅक्शन ग्रुप’ आणि पुणे येथील आघारकर संशोधन संस्थे’च्या ‘बायोडाव्हर्सिटी अॅण्ड पॅलेओबायोलॉजी ग्रुप’ मधील पूजा घाटे, भूषण शिगवण, सारंग बोकील आणि अपर्णा वाटवे या संशोधकांनी केलेले हे संशोधन ‘जर्नल ऑफ इकोलॉजिकल सोसायटी या नियतकालिकामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. डायमेरिया, हेटेरोपोगॉन, इस्चिमम, अप्लुडा मुटिका, अरूंडीनेला नर्वोसा, इस्चिमम सिलीएर, इस्चिमम रिटची, इस्चिमम सेमीसॅजिटेंटम, प्युडांथी स्ट्रीया अंबेलाटा, थिमेडा आदी गवताच्या प्रजाती आढळून आल्या असून, त्यांची छायाचित्रे संशोधकांनी डिजिटल हर्बेरियम स्वरूपात ‘आय नॅचरलिस्ट’ या संकेतस्थळावर संग्रहित केली आहेत.

कोकण परिसरातील सड्यावर गवताच्या विविध प्रकारच्या प्रजाती आढळून येत असून, जैवविविधतेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका ठरते. पशुधनासाठी वैरणासह अन्य कारणांसाठी या गवताचा उपयोग होतो; मात्र, विविध कारणांमुळे घटत असल्याने त्याचा वापर कमी होऊ लागला आहे. अशा कातळ सड्यांवर आढळणाऱ्या गवताच्या प्रजाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि त्यांच्या वापरामध्ये झालेले बदल या अनुषंगाने पूजा घाटे, भूषण शिगवण, सारंग बोकील आणि अपर्णा वाटवे यांनी संशोधन केले. राजापुरातील कशेळी, बाकाळे, देवाचे गोठणे, रुंडे, देवीहसोळ आदी परिसरामध्ये स्थानिक लोकांशी संवाद साधून प्रजातीचे फुलणे, पोत, रंग, स्वरूप यांसह चाऱ्याचे मूल्य, हंगामी पसंती, गवताचे इतर उपयोग आणि साठवणुकीच्या पद्धती याचा अभ्यास केल्याची माहिती पूजा घाटे यांनी दिली.

असा होईल गवताचा उपयोग
भारतामध्ये सध्या हिरव्या चाऱ्याची सुमारे ३५.६ टक्के तर कोरड्या चाऱ्याची १०.९५ टक्के कमतरता भासत आहे. महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पशुधन पाळले जाते; मात्र, त्यामुळे या भागामध्ये चाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात मागणी असते. या साऱ्याचा विचार करून कोकण सडा परिसरामध्ये वापरात न येणाऱ्या गवताचा साठा करून मागणी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना विक्री केल्यास त्यातून रोजगार निर्मिती करणे शक्य होणार आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 02/Jan/2025