खेड : गोड्या पाण्यातील जलप्रदूषण माशांच्या प्रजातीला ठरतेय धोकादायक

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीतून विविध कारखान्यांमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोतवली येथे खाडीत सोडण्यात येत असल्यामुळे खाडीपात्रातील किंबहुना नदीपात्रातील माशांच्या प्रजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षात झपाट्याने माशांची प्रजाती कमी होत चालली असून याला कारणीभूत जलप्रदूषण हाच घटक ठरत आहे.

हवेच्या प्रदूषणासोबत जलप्रदूषणदेखील दिवसेंदिवस वाढत चालले असून लोटे एमआयडीसीमधील अनेक कंपन्या सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित असतानादेखील सांडपाणी परस्पर खाडीत सोडत असल्याने असंख्य दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. याला केवळ कारखान्यांमधून सोडण्यात येणारे दूषित पाणी कारणीभूत ठरत आहे.

माशांची प्रजाती कमी होत चालल्याने मासेमारी व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा भोई समाज त्याचबरोबर काहीअंशी असलेला गोपाळ समाजदेखील झपाट्याने कमी होणाऱ्या माशांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. लोटे सीईटीपी पाईपलाईनद्वारे सोडण्यात येणारे पाणी हे कोतवली मार्गे दाभोळ खाडीत जात असल्याने पारंपरिक मच्छी व्यवसायावर संकट आले आहे. खाडीपात्रात मिळणारे मासे हे दिवसेंगणिक कमी होत चालले आहेत. त्याचा फटका गोड्या पाण्यातील माशांवर देखील होऊ लागला असून पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ म्हणून ओळखला जातो. परंतु या काळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन देखील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी माशांचे प्रमाण घटलेलेच दिसून आले असल्याचे हा व्यवसाय करणारे सांगतात.

गोड्या पाण्यातील मळयाचे मासे, सुतेरी (वाम), पालू, कालचेडू (गोड्या पाण्यातील गावठी पापलेट), शिंगटी, खरबी, खवल, कटला, मांगण, रेनवी, तांबूस, कोमट, कोळंबी यासारख्या माशांच्या प्रजाती गेल्या काही वर्षात खाडी व नदीपात्रात तग धरुन होत्या. परंतु वाढत्या जलप्रदूषणामुळे यातील बहुतांशी प्रजाती या नष्टच झाल्या आहेत. त्यापैकी रेनवी, मांगण, तांबोशी, कोमट, कालचेड़, खरबी, कोळंबी या माशांच्या प्रजाती जवळजवळ हद्दपारीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत.

गोड्या पाण्यात काही अंशी मिळणारे हे मासे आता जाळयात सापडत नाहीत. त्यामुळे ते नष्ट झाले आहेत असे व्यावसायिक सांगतात. स्थानिक मासेमारीच्या दृष्टीने खाडीपात्र व येथील जगबुडी नदीपात्र हे दोनच पर्याय येथील स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध आहेत. परंतु या व्यवसायावरच एमआयडीसीच्या दूषित पाण्याने आक्रमण केल्याने माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. भोई समाज, आदिवासी समाज, गोपाळ समाज या मासेमारी व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतो. परंतु गेल्या काही वर्षात बाजारपेठेमध्ये स्थानिक गोड्या पाण्यातील मासेच उपलब्ध होत नसल्याने खवय्यांनादेखील या कमी होत चाललेल्या प्रजातीबाबत चिंता दिसून येते.

सद्यस्थितीत सर्वच प्रजातींपैकी मळ्याचे मासे हा एकमेव मासा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहे. परंतु हेच मासे २०० रुपये प्रति किलो या चढ्या दराने विकले जातात. मात्र गोड्या पाण्यातील ही प्रजात असल्याने मच्छीमार बांधवांना काहीअंशी सुगीचे दिवस येतात. परंतु त्याला उपलब्ध होण्यासदेखील बराच अवधी लोटत असल्याने ही माशाची. प्रजातदेखील हळूहळू नष्ट होऊ लागली आहे.

खेड तालुक्याला निसर्गान भरभरुन निसर्गसौंदर्य दिले आहे. त्यात विस्तीर्ण जगबुडी नदीचा किनारा, त्याचबरोबर खाडी हे पर्याय मासेमारीसाठी उपयुक्त मानले. जातात. परंतु या नदी किनारीदेखील मगरींचा यावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांना धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे एकीकडे दूषित पाणी तर दुसरीकडे नष्ट होत जाणारी प्रजाती यामुळे मासेमारी व्यवसायावर कारखानदारीमुळे संकटच ओढवले आहे. दूषित पाणी सोडण्याचा वेग असाच कायम राहिल्यास येथील माशांच्या सर्वच प्रजाती नष्ट होऊन नदीपात्रे माशांअभावी ओस पडतील, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी एमआयडीसीचा सीईटीपी प्रकल्प सक्षमतेने राबविल्यास माशांच्या प्रजातींना अभय मिळेल व मच्छीमार बांधवांनाही चार पैसे मिळतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 04/Jan/2025