ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सिडनीच्या मैदानातील कसोटी सामना अवघ्या ३ दिवसांत संपला. या सामन्यातील पराभवासह भारतीय संघाने ५ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशी गमावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पराभवामुळे नामुष्की ओढावलेल्या टीम इंडियावर आता आणखी एक संकट आले आहे.
संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची ‘घरवापसी’ मुश्किल झाल्याचे समोर येत आहे. जाणून घेऊयात काय आहे त्यामागचं नेमकं कारण…
टीम इंडियावर आली वेटिंगची वेळ
भारतीय संघाच्या जवळपास दोन महिन्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता ही ७ जानेवारीला होणं अपेक्षित होते. सिडनीच्या मैदानातील तिसरा सामना ३ ते ७ जानेवारी २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीत नियोजित होता. त्यामुळे टीम इंडिया ८ जानेवारीला ऑस्ट्रेलियातून पतीच्या प्रवासाला सुरुवात करणार होती. पण सिडनी कसोटी दोन दिवस आधीच संपली. परिणामी आता टीम इंडियातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना मायदेशी परतण्यासाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे.
मायदेशी परतण्यासाठी तिकीटाची जुळवाजुळव करण्याचं काम
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडियातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना मायदेशी परतण्यासाठी तिकिटांची जुळवाजुळ करावी लागत आहे. काही वरिष्ठ खेळाडूंनी सोमवारीच फ्लाइट पकडल्याचेही बोलले जाते. पण अन्य खेळाडूंसाठी नियोजित वेळेआधी तिकीट मिळवण्यासाठी बीसीसीआयला धडपड करावी लागत आहे. तिकीट उपलब्ध होतील तसे संघातील खेळाडूं मायदेशी परतणार आहेत.
टीममध्ये फुट, तिकीट मिळतील तसे घरी परतणार खेळाडू
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू दोन वेगवेगळ्या गटासह रवाना झाले होते. विराट कोहली संघासोबत न जाता फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियाला पोहचला होता. रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर संघाला जॉईन झाला होता. आता परतीच्या प्रवासातही खेळाडू एकत्र दिसणार नाहीत, हे स्पष्ट होते.
दोन महिन्यांच्या दौऱ्यात ७७०० किमी प्रवास
भारतीय संघानं पर्थ कसोटी सामन्यातून दौऱ्याला सुरुवात केली होती. पहिला सामना जिंकल्यावर टीम इंडिया सातत्याने संघर्ष करताना दिसली. फलंदाजांमुळे शेवटी टीम इंडियावर दहा वर्षांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. या दौऱ्यात भारतीय संघानं जवळपास ७७०० किमी एवढा प्रवास केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 06-01-2025
