देवरुख : बीड येथे झालेल्या सरपंच निघृण हत्येप्रकरणी संगमेश्वर तालुका सरपंच संघटनेच्यावतीने सोमवारी देवरुख तहसीलदारांना गुन्हेगारांवर कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी या घटनेचा संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
या निवेदनाद्वारे कैफियत मांडणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आले. निवेदनात ग्रामपंचायत मस्साजोग तालुका केज, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचा निषेध करण्यात आला.
हत्या झाल्यावर त्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटकही झालेली नाही, त्यांना अटक करुन अशा अमानुष हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा मिळावी व शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा व या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, कठोर कारवाई न झाल्यास सर्व सरपंचांना गावात काम करणे कठीण जाईल तसेच अशा कृत्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये असुरक्षितता वाढेल, असे या निवेदनात म्हटले आहे. या घटनेची गांभीयनि दखल घ्यावी व न्याय मिळावा, असे म्हटले आहे.
निवेदन देताना संगमेश्वर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व हातीव सरपंच नंदकुमार कदम, नांदळज सरपंच दिलीप गोवळकर, मेघीच्या शीतल हेगिष्टे, असुर्डेचे प्रदीप शिंदे, धामणीचे संतोष काणेकर, परचुरीच्या शर्वरी वेल्ये, चोरवणेचे दिनेश कांबळे, कासारकोळवणच्या मानसी करंबेळे, आंबवलीच्या दीप्ती सावंत, मुरादपुरच्या सरपंच दीक्षा बांडागळे उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 08/Jan/2025












