पक्षात सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांना काढून टाका : नारायण राणे

रत्नागिरी : भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे, तरी रत्नागिरी जिल्ह्यात त्याची सदस्य नोंदणी ३० टक्केही झालेली नाही. कुठे आहेत विविध मोर्चाचे पदाधिकारी, कुठे कुठे आहेत अन्य पदाधिकारी, जे सक्रिय नाहीत त्यांना काढून टाका आणि नवीन लोकांना संधी द्या. शिर्डीत होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात रत्नागिरी जिल्ह्यातील सदस्य नोंदणीबाबत काय उत्तर द्यायचे. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. यापुढील आढावा बैठक दरवाज्या, खिडक्या बंद असणाऱ्या सभागृहात घ्या, अशा कानपिचक्या भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मराठा भवन येथे संघटन पर्व आढावा बैठकीत व घर चलो अभियानाच्या प्रारंभ आज झाला. खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी भाजपच्या सदस्य नोंदणीची आढावा बैठक खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आदीकडून रत्नागिरी, राजापूर, चिपळूण विधानसभा मतदार संघातील सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या नोंदणीमध्ये जिल्ह्याला दीड लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पक्षाने दिले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष नोंदणीची आकडेवारी पदाधिकारी डोक्याला हात लावतील, अशी अगदी नगण्य आहे. यात रत्नागिरीमध्ये बारा हजार, चिपळूण सहा हजार राजापूर अडीच ते तीन हजार नोंदणी झाली आहे. चिपळूण मतदारसंघातूनही अपेक्षाभंग झाला. कोणी माहिती देण्यासाठी आलेच नाही तसेच विविध मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले; परंतु एकाह्य पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे खासदार राणे यांनी नोंदणीची माहिती घेतल्यानंतर ते प्रचंड नाराज झाले.

राणे म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वी एकच होता. आता ते वेगवेगळे झाले असले, तरी एकच जिल्हा म्हणून मी वागतो. सर्वांचा आढावा घेतल्यानंतर पक्षाचे काम तुम्ही किती गांभीर्याने करता, हे लक्षात आले.

तुम्ही विकासकामे, निधी जरूर मागावा; पण आपला जिल्हा सदस्य नोंदणीत कुठे आहे? तुम्हाला दिलेल्या जबाबदारीचे काय? पाच वर्षानंतर आपले सरकार येणार, या हेतूने काम करा. आढावा बैठकीला चिपळूणमधून माहिती येत नाही. जे पक्षाचे काम करत नाही, सक्रिय नाहीत त्यांना काढून टाका. नव्या लोकांना संधी द्या.

फायदा मित्रपक्षाला
विकासकामांना आपण मागे पडतो. त्यामुळे पक्षवाढीला आणि संघटन बांधणीला अडचणी येत आहेत. महायुतीच्या सरकारकडून विकासकामे होत आहेत; परंतु त्याचा फायदा आपल्या मित्रपक्षाला होत आहे. पक्षाच्या विचारांबरोबर निधी मिळण्याची गरज आहे. निधी मिळाल्यास पक्षवाढीला त्याचा नक्की फायदा होईल, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 10/Jan/2025