रत्नागिरी : बसस्थानकावर चणे शेंगदाणे विकण्यापासून अगदी रिक्षा चालवण्यापर्यंतचा प्रवास कष्टप्रद होता. त्यानंतर अवजड वाहन चालवण्यास शिकल्यापासून ते नवीन घेण्यासाठी सर्व बँकांनी हात आकडते घेतलेले असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठीशी उभे रहात १६ वर्षापूर्वी ट्रक घेण्यास सहकार्याचा हात दिला. जिल्हा बँकेने केलेल्या या मदतीमुळेच आज समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळत असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट व्यावसायिक गणेश सकटे यांनी दिली.
आपल्या वाटचालीविषयी बोलताना ते म्हणाले म्हणाले की, चिपळूण काविळतळी येथे वास्तव्यास होतो. आई नलिनी धुणीभांडी करायची घरची आर्थिकस्थिती गरिबीची होती. शाळेत जात असतानाच चिपळूण बसस्टॅण्डवर आपण चणे शेंगदाणे विकले. याच दरम्यान, दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण घेतले. त्यानंतर आपण रिक्षा चालविण्यास शिकलो. पुढे १९९५ साली ट्रक शिकलो. चिपळूण
येथील व्यावसायिक विवेक भिडे यांच्या गाडीवर काही वर्षे चालक म्हणून काम केले. याचवेळी मोठी गाडी घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द मनात निर्माण झाली. परंतु चिपळूणमध्ये कोणतीही बैंक कर्ज देण्यास तयार नव्हती. एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. परंतु त्याच्यामध्ये व्यवसाय करण्याची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छा शक्ती आहे. अशा होतकरू तरूणाला बँकांकडून कर्ज मिळणे फार दुरापास्त असते याचा प्रत्यय आला. परंतु चिपळूण बसस्थानकामध्ये चणे शेंगदाणे विक्री करणाऱ्या माझ्यासारख्या तरूणावर रत्नागिरी जिल्हा बँकेचे तालुक्याचे तत्कालीन अधिकारी ए. बी. चव्हाण यांनी विश्वास दाखविला. त्यांच्यामुळेच नवीन आयशर ट्रक खरेदीसाठी सन २००९ मध्ये जिल्हा बँकेने ९ लाख कर्ज दिले. त्यानंतर सातत्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपला हुरुप वाढवत मोडकळीस आलेले जुने घर नवीन बांधण्यासाठी ६ लाख ७८ हजार कर्ज दिले. हा ट्रक व घरकर्जाचे नियमीत हप्ते भरणा करून दोन्ही कर्जखाती पूर्णफड केल्यानंतर सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुन्हा नवीन ट्रक खरेदीसाठी १८ लाख ७८ हजार कर्ज दिले. या कर्जाची सुध्दा नियमीत परतफेड करून सदरचे कर्ज मुदतीत पूर्णफड केले. त्यामुळे बँकेने जानेवारी २०२५ मध्ये नवीन आयशर ट्रक खरेदीसाठी २७ लाख ४५ हजार कर्ज दिले आहे. मी रत्नागिरी जिल्हा बँकेचा ऋणी आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केल्यामुळे बँकेने माझ्यावर विश्वास टाकल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, अधिकारी व कर्मचारी यांचा ऋणी आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेने मला वाहतूक व्यवसाय करण्यासाठी मदत केली नसती, तर आज हे दिवस माझ्या कुटुंबाला प्राप्त झाले नसते, असे स्पष्ट मत गणेश सकटे यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 11/Jan/2025













