साटवली गढी संवर्धनासाठी संचालक स्तरावरून कागदपत्रांची मागणी; शिवकालीन गढीचे मूळ वैभव आणि इतिहास जपण्यास मिळणार गती
Satavali Gadhi Lanja येथील ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी आता शासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेली ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ‘साटवली गढी’ (साटवलीचा किल्ला) आता ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गढीला राज्य संरक्षित दर्जा देण्यासाठी राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाकडून वेगवान हालचाली सुरू असून, संचालक स्तरावरून आवश्यक ती शासकीय कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. या संदर्भातील प्रस्ताव सध्या अंतिम प्रक्रियेत असल्याची अधिकृत माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जलमार्गावरील महत्त्वाचे केंद्र
लांजा शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेली ही शिवकालीन गढी साधारण ५ एकर परिसरात पसरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जलमार्गावरील व्यापारावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि मालाचा साठा (कोठार) करण्यासाठी या गढीचा मुख्य वापर केला जात असे. पूर्णगड खाडीमुखातून मुचकुंदी नदीमार्गे चालणाऱ्या जल-व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे हे एक मुख्य केंद्र होते. ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या गढीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून, तिचा मुख्य दरवाजा दोन बुरुजांच्या मध्ये वक्राकृती पद्धतीने बांधण्यात आला आहे.
गढीच्या परिसरात तोफ, विहीर आणि प्राचीन शिल्पे
काळाच्या ओघात या साटवलीतील शिवकालीन गढीची मोठी पडझड झाली आहे आणि तिची एक भिंत ढासळली आहे. मात्र, या पडझडीनंतरही गढीच्या परिसरात आजही अनेक ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने एक विठ्ठल-रखुमाई मंदिर, एक छोटी तोफ, आयताकृती विहीर आणि प्राचीन वीरगळ (शिल्पे) यांचा समावेश आहे, जे आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करतात.
पर्यटन विकासाला मिळणार मोठी चालना
निसर्गाच्या कुशीत विसावलेला हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी अत्यंत शांत आणि नयनरम्य आहे. दरवर्षी देवदिवाळीच्या काळात स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने येथे भव्य दीपोत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला एक वेगळेच चैतन्य लाभते. सध्या लांजा आणि राजापूर येथून साटवलीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसेस उपलब्ध असल्याने पर्यटकांना येथे पोहोचणे सहज सोपे जाते. पुरातत्व विभागाच्या या निर्णयामुळे गढीच्या संवर्धनाला गती मिळणार असून, भविष्यात लांजा परिसरातील पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 11-07-2026














