चिपळूण : पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये रोजगार मिळणे आता अवघड बनले आहे. जे तरुण उच्च शिक्षण घेऊन स्पर्धेत उतरत आहेत, अशांनाच रोजगाराची संधी आहे; अन्यथा रोजगाराची संधी शोधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पुरेसा आहे.
या जिल्ह्यामध्ये दैनंदिन गरजा भागवणारा रोजगार निर्माण करण्यासाठी बेरोजगारांनी पुढे येणे आवश्यक आहे.
भाजीपाला निर्मिती या व्यवसायाला जिल्ह्यात मोठी संधी आहे. सध्या पुणे, वाशी मार्केट आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजीपाला जिल्ह्यात येतो. चिपळूण तालुक्यातील कळंवडे, कामथेसह काही गावांतील महिलांनी भाजीपाल्यातून स्वयंरोजगाराचा मार्ग शोधला आहे.
उन्हाळी हंगामातील फळ पीक व्यवसायातून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. उन्हाळी हंगामातील कलिंगड, काजू, हापूस आंबा, आदी पिकांना मोठी संधी आहे.
जिल्ह्यामध्ये प्रतिदिन दीड ते दोन लाख लिटर दुधाची मागणी आहे.
जिल्ह्याच्या दुधाची तहान परजिल्ह्यांवर अवलंबून आहे. जिल्हामध्ये केवळ ३५ हजार लिटर जेमतेम दूध उत्पादन केले जाते. चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प उभा राहिला आहे. दूध व्यवसायातून बेरोजगारांना मोठा व्यवसाय उभारण्याची संधी आहे. यासाठी बँका मोठे कर्ज देण्यासाठी तयार आहेत. जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायला मोठ्या प्रमाणात संधी आहे. चिपळूण तालुक्यात १३ तरुणांनी कुक्कुटपालन आणि अंडी व्यवसाय प्रकल्प सुरू करून बेरोजगारीवर मात केली आहे. परजिल्हावर अवलंबून असलेला हा व्यवसाय जिल्ह्यातील तरुणांना मोठा रोजगार निर्माण करून देऊ शकतो
उपयोगाचे प्रशिक्षण
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्याने कौशल्य विकास अभ्यासक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम दिला जातो. तसेच माध्यमिक शाळांमध्ये आठवी आणि नववीसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमही सुरू केला आहे.
एमआयडीसीतून प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि देवरुख येथे एमआयडीसी आहेत. यातील अनेक भूखंड पडून आहेत. ते लहान उद्योजकांना मिळाले तर “एमआयडीसी ऊर्जितावस्थेत येईल. येथील तरुणांना रोजगार मिळेल. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दापोली, रत्नागिरी, लांजा, राजापूर येथे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आंबा, काजू, मासे आणि फणसावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल.
पर्यटन व्यवसायातून संधी
गोव्यात जाणारा पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात थांबून जात असाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय तेजीत आला आहे. जिल्ह्यातील गहकिाले, देवस्थान, समुद्र, खाडी किनारे, पर्वत रांगांमध्ये सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळत आहेत. त्यामुळे पर्यटनातून स्वयंरोजगाराची मोठी संधी आहे.
‘आर्थिक विकास’चे पाठबळ
बीज भांडवल कर्ज योजना बीज भांडवल कर्ज योजना जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अर्जदारास ५ लाखांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायांकरिता अर्थसहाय्य मिळते. यात राष्ट्रीयीकृत अधिसूचित बँकेचा सहभाग ६० टक्के, अर्जदारास ५० टक्के रक्कम स्वतः चा सहभाग म्हणून भरावयाची असते. गट प्रकल्प कर्ज योजना रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम रोजगार मिळावे, स्वयंरोजगार मेळावे, कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 13/Jan/2025














