चिपळूण : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८३३ प्रशिक्षणार्थीचा म्हणजेच विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या लाडका भाऊ योजनेचा सहा महिन्यांचा कार्यकाळ जानेवारीत संपुष्टात येणार आहे.
युवक वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून दिले जाते. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योगक्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवावर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जुलै २०२४ पासून सुरू केली. त्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन हजारावर युवकांच्या हाताला काम मिळाले; परंतु आता त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी जानेवारी २०२५ मध्ये संपणार असून त्यांच्या जागी नवीन बेरोजगारांची नेमणूक करण्यात येईल.
त्यामुळे जुने लाभार्थी पोरके होण्याची शक्यता आहे. त्यांची जागा सुरुवातीला अर्ज करणाऱ्या अर्जदारांना घेणार आहेत. त्यासाठी संबंधित आस्थापनांना कौशल्य विकास विभागाकडे मनुष्यबळाची मागणी नोंदवावी लागेल. प्रत्येक युवक युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवक युवती आणि त्यांचे पालक जागरूक असतात. राज्य शासनदेखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. त्यामुळे जुन्या लाभार्थ्यांसाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली. योजने अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार १८३३ युवा प्रशिक्षणार्थीना विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. त्यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. – इनुजा शेख, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 15/Jan/2025
