राजापूर : राजापूर तालुक्यातील अणसुरे खाडीतून मोठ्या प्रमाणावर वाळू सदृश्य शिंपल्याची कच उपसा सुरू आहे. यामुळे खाडीतील जलजीवन धोक्यात आले आहे. यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. त्याची दखल घेऊन राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी तहसीलदार विकास गमरे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर अणसूरे खाडीत मागील १० ते १२ वर्षापासून शिंपल्यांची कच काढून त्याची केरळ, कर्नाटक या राज्यात वाहतूक केली जाते. प्रारंभी केरळ येथील एक व्यावसायिक शासनाकडून काही ब्रासची परवानगी घेऊन हे कच उत्खनन करत होता. मात्र, याला विरोध होत असल्याने त्याने काही स्थानिक मंडळींना हाताशी धरुन हे उत्खनन सुरु ठेवले आहे.
गतवर्षी या उत्खननातून काढलेली कच विनापरवाना वाहतूक करताना राजापूर तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचे पुढे काय झाले, ते मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ अणसुरे खाडीतून काढण्यात येणाऱ्या या कचमुळे परिसरातील रस्त्यांचे व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी वारंवार झालेल्या आहेत. मात्र, काही अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या वरदहस्ताने हे उत्खनन अद्यापही सुरुच आहे.
आता तर गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी हे उत्खनन केल्यामुळे खाडीतील सागरी जीवसंपतीला धोका निर्माण झाला आहे. खाडीची खोली दिवसेंदिवस वाढत चालल्याने या परिसराला भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
परवानगी नसतानाही अवैध उत्खनन
येथील वाळूउपसाबाबत राजापूर तालुका प्रशासनाशी संपर्क साधला असता या कार्यालयाने अशा प्रकारच्या कुठल्याही उत्खननाला परवानगी दिली नसल्याचे सांगत याबाबतची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतली गेली असेल असे सांगितले. मात्र, याबाबत उत्खनन करणाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नेमकी कोणत्या कार्यालयाने वाळूउपसाची परवानगी दिली आहे, हे सांगण्यास मात्र नकार दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 16/Jan/2025
