चिपळूण : राज्यात कूळ कायद्याच्या तरतुदी लागू झाल्यानंतर देवस्थानांच्या बऱ्याचशा जमिनीवर कुळांनी महसूल खात्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकरवी स्वतःचे नाव लावून घेतले आहे. तसेच भूमाफियांनीही संगनमताने शेतजमिनीवरील संस्थानचे नाव कमी करून जमिनी हडप केल्या आहेत. या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमीन बळकावणे प्रतिबंध कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा संयोजक हभप अभय सहस्त्रबुद्धे, सहसंयोजक चंद्रकांत श्री केदारनाथ देवस्थान सावर्डेचे प्रदीप चव्हाण, श्री महादेव काळेश्वरी भानोबा देवस्थान भिलेचे सचिव सुभाष गुडेकर, श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे खजिनदार शाळीग्राम विखारे, सहसचिव वसंत भैरवकर, विश्वस्त संतोष टाकळे, श्री सुकाई देवी मंदिर वारेलीचे दीपक कदम, सतीश निवदेकर, श्री केदार सुकाई झोलाई मंदिर मोरवणेचे प्रभाकर शिंदे, खंड येथील श्री हनुमान मंदिराचे यतीन कानडे, पेढे येथील श्री जनार्दन मालवणकर, श्री कालिका माता मंदिर साखर (ता. खेड) चे सचिव गणेश, महाराष्ट्र पंडित महासंघ संघटक सुरेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके आदी उपस्थित होते.
मंदिराचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती, वार्षिक धार्मिक उत्सव इत्यादी धार्मिक विधी व्यवस्थित पार पडावेत, या हेतूने राजे, महाराजे आणि भाविक भक्तांनी देवस्थानांना शेत जमिनी दान दिल्या. या जमिनीचे कोणतेही बेकायदेशीररित्या हस्तांतरण करता येत नसूनही जमिनीचे कब्जेदार व भूमाफियांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक महसूल प्रशासनाच्या मदतीने या शेत जमिनीवरील संस्थानचे नाव बेकायदेशीररित्या कमी करून बऱ्याच जमिनी हडप्पनात आल्या आहेत.
कुळांकडून बेकायदेशीर पद्धतीने नाव
महाराष्ट्रात कूळ कायद्याच्या तरतुदी लागू झाल्यावर देवस्थानांच्या बऱ्याच जमिनी कुळांनी स्वतःचे नाव महसूल खात्यातील संबंधित अधिकारी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत बेकायदेशीरपणे लावून देवस्थानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेले आहे. या सर्व प्रकरणात महसूल खात्यातील भ्रष्ट अधिकारी यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 16/Jan/2025
