सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्या घरात मध्यरात्री एका चोराने प्रवेश केला. त्याला सैफने अडवण्याचा प्रयत्न केला असता, चोराने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सारख्या शहरात एका ख्यातनाक अभिनेत्याच्या घरात चोरटा शिरतोच कसा आणि त्यानंतर तो अभिनेत्यावर हल्ला करतोच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विरोधकांकडून या घटनेवरुन राज्याच्या गृह खात्यावर निशाणा साधला जातोय. यानंतर राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “प्रायमरी इन्फॉर्मेशन नुसार, आरोपींच्याबाबत कुठल्याही गॅंगचा अँगल नाही. माजी मंत्री बाबा सिद्धकी, अभिनेता सलमान खान यांच्याबाबत जी घटना झाली त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही. हा चोरीचा प्रकार आहे, असे दिसून येते. चोर घराच्या मागच्या भिंतीवरून चढला होता. चार माळ्याची बिल्डिंग आहे. त्या चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कमी होते”, असं योगेश कदम यांनी सांगितलं.

‘या गोष्टीला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही’

“एका सीसीटीव्हीतून त्याचा चेहरा समोर आलेला आहे. तो फोटो आमच्या इन्फॉर्मन यांना पाठवलेला आहे. लवकर आरोपीला पकडले जाईल. पण यात कुठलाही गँग्स अँगल नाही. फक्त सैफ अली खानचं आडनाव खान आहे म्हणून राजकारण काही लोक करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाकावरून फेकले आहे. आता तुम्ही विरोधी बाकावर आहात. पण काहीही बरळत राहाल. या गोष्टीला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही”, असं योगेश कदम म्हणाले.

‘या घटनेला राजकीय रंग देणे म्हणजे…’

“आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इतकं लक्षात घ्यावं, या घटनेला सामाजिक आणि राजकीय रंग देणे म्हणजे त्यांची राजकारणातील परिपक्वता किती आहे हे लक्षात येतं. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे. त्या बिल्डिंगमध्ये पोलीस डिपार्टमेंटची कोणतीही सिक्युरिटी नव्हती. जी काही होती ती प्रायव्हेट सिक्युरिटी होती”, असं योगेश कदम म्हणाले.

‘फक्त चोरीचा अँगल’

“मुळात सैफ अली खान यांचं घर चार माळ्यांचं आहे आणि तिथे सीसीटीव्ही नव्हते. तो डेटा जो मिळाला त्यात उशीर झालेला आहे. एका सीसीटीव्हीतून आरोपीचा फोटो मिळाला आहे. म्हणून याला कुठलाही धार्मिक रंग देणं चुकीचं राहील. प्राथमिक माहितीनुसारस फक्त आणि फक्त चोरीचा अँगल यात दिसून येतोय. एखाद्या घरात चोर शिरला, फॉरेन्सिक विभागाने आरोपीचे घरात शिरण्याचे पुरावे गोळा केले आहेत. ते लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत”, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

“कोणत्याही मर्डरच्या प्रयत्नाने चोर आला होता, असं प्राथमिक माहितीत दिसत नाही. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेला आणि त्यावेळेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यात झटापट झाली असं प्राथमिकरित्या दिसून येते. गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात आपण सर्व सेफ आहोत. मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात”, असं योगेश कदम म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 16-01-2025