राजापूर-लांजा मतदारसंघाला मॉडेल मतदारसंघ बनवणार : आ. किरण सामंत

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ, जो अरबी समुद्राच्या किनार्‍यापासून सह्याद्रीच्या टोकापर्यंत पसरलेला आहे, अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता या मतदारसंघाचे नूतन आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी येथे मोठा उद्योग आणून विकासाचा नवीन प्रयोग करण्याची घोषणा केली आहे.

शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा पराभव करून किरण सामंत यांनी या मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर खूष होऊन जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. या विजयानंतर, त्यांनी विकासकामांना गती दिली आहे. राज्यात ज्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व मंत्री करीत आहेत, त्या मंत्र्याचे मतदारसंघ विकसित झाले आहेत, मात्र राजापूर-लांजा मतदारसंघ अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत राहिला आहे. किरण सामंत यांनी स्पष्ट केले की राज्यातील मॉडेल मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ विकसित करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

विशेषत: अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांची कामे अर्धवट आहेत. रस्ते, आरोग्य, शाळा हे प्रश्न आहेतच, परंतु महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न मतदार संघाला भेडसावत आहे. येथील तरुण पिढी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जात आहे रोजगारासाठी. त्यामुळे येथील तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प राजापूर, लांजा मतदार संघात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच तो जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नुसती पत्रे देऊन विकासकामे होत नाहीत, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरीत्या माजी आमदारांना लगावला. कामे वेळेवर का होत नाहीत हेही पाहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे मतदारसंघातील विकासकामांची जबाबदारी माझी असणार असून संघटनावाढीची जबाबदारी पदाधिकारी सांभाळतील, असा विश्वासही त्यांनी पदाधिकार्‍यांवर व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 17/Jan/2025