रत्नागिरी: रत्नागिरी शहरात शरीरसौष्ठव क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत प्रतिष्ठेची अशी ‘७२ वी राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने प्रायोजित असलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण देशातील शरीरसौष्ठवपटूंचे लक्ष आता रत्नागिरीकडे लागले आहे.
स्पर्धेचे ठिकाण आणि आयोजक
गोगटे जोगळेकर कॉलेज येथील कै. श्रीराम हरी खातू नाट्यमंदिर येथे या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर सौष्ठव महासंघ यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेमार्फत या स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.
दिग्गजांची मांदियाळी आणि सुहास खामकर यांचे विशेष आकर्षण
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार किरण सामंत भूषवणार आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी शरीरसौष्ठव क्षेत्रातील महामेरू आणि ९ वेळा ‘भारत श्री’ किताब पटकवणारे सुहास खामकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने:
- जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे
- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
- पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
- जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप
- उद्योजक रविंद्र (अण्णा) सामंत
- नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर
- जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, मुख्याधिकारी वैभव गारवे
२ मे रोजी होणार बक्षीस वितरण
दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा २ मे रोजी रात्री ८ वाजता पार पडणार आहे. रत्नागिरीतील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
रत्नागिरीतील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.














