रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने नुकतेच १९८ या वर्षात पदार्पण केले इतकी प्रदीर्घकाळ चालणारी रत्नागिरीतील ही एकमेव पुरातन संस्था असावी. १ लाख १५ हजारांच्या ग्रंथसंपदेसह हे वाचनालय दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते.
पुढील ७५ वर्षांचा विचार करून नूतन वास्तू निर्माण
वाचनालयाची इमारत ही ग्रंथ व वाचक यामधला सुसूत्रबद्ध दुवा असतो आणि हा दुवा म्हणजे वाचनालयाची इमारत उत्तम असावी, वयोपरत्वे त्याचे नूतनीकरण व्हावे ही काळाची गरज आहे. जुनी इमारत ५२ वर्षांपूर्वी उभारली होती. ती जीर्ण झाली असल्याने ती पाडून नवी इमारत बांधणे अनिवार्य होते. यास्तव उचित परवानग्या घेऊन वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले असून नवी दुमजली ११५०० चौरस फुटाची इमारत अल्प कालावधीत उभी करण्याचे ध्येय आहे. जानेवारी २०२७ मध्ये वाचनालयाचा द्वीशताब्दी महोत्सव सुरू होतो त्यापूर्वी हे वाचनालय नव्या वास्तूत स्थिरस्थावर करण्याचे उद्दिष्ट आहे.
सुंदर आराखडा तयार
या इमारतीत तळमजल्यावर वाचक कक्ष व पुस्तक मांडणी विभाग, पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह, दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका, बाल व महिला वाचक विभाग व डिजिटल रूम असा आराखडा बनवला आहे. या सर्व कामासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी १ कोटी २० लाख वाचनालयाने उभे केले आहेत. उर्वरित रकमेसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे वाचनालय हे रत्नागिरीचे वैभव आहे.
जनसहभागा चे महत्व अनन्यसाधारण
सुसंस्कृत, शालिन रत्नागिरीची ओळख देणारे हे वाचनालय त्याची नवीन वास्तू उभी राहत असताना प्रत्येक रत्नागिरीकराचे योगदान स्वयंस्पुर्तीने या बांधकामासाठी मिळाले तर नूतन वास्तू लोकसहभागाच्या बळावर वेगाने उभी राहील. यास्तव सर्वांना रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे पुनर्बांधणीसाठी आर्थिक योगदान देण्याचे विनम्र आवाहन करीत आहे.
वाचनालय हे जनाश्रयावर चालते शासकीय ग्रांट अत्यल्प
हे वाचनालय शासकीय खर्चाने चालते असा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. प्रत्यक्षात ही संस्था आहे आणि वाचकांकडून जमा होणारी वर्गणी, प्रयत्नपूर्वक डोनेशन व अन्य मार्गांनी उभारलेला निधी यातून हे वाचनालय चालते. शासन जी ग्रँट देते त्यातून काही प्रमाणात पुस्तक खरेदी व कर्मचारी वर्गाचे वेतन एवढेच भागू शकते. मात्र वाचनालयाची अद्यावत इमारत, तेथील संगणीकरण, होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी ग्रंथसंपदा या सर्वांसाठी वाचनालय केवळ जन सहभागावर अवलंबून आहे. त्यामुळे हे वाचनालय शासनाचे अंगीकृत नाही. केवळ रत्नागिरी नगरपरिषदेने इमारतीसाठी जागा वाचनालयाला लीजने दिली आहे. कोणतीही आर्थिक मदत स्थानिक स्वराज्य संस्था करत नाही. अनेकांनी वाचनालयाला शासन आर्थिक मदत करेल अशी भूमिका घेतली. त्याबाबत स्पष्टीकरण होणे आवश्यक होते यासाठी स्पष्ट खुलासा करीत आहे.
स्वेच्छा योगदानाची अपेक्षा
आपल्या वाचनालयाची नूतन शानदार वास्तू उभी राहावी यासाठी रत्नागिरीकरांनी स्वेच्छेने योगदान द्यावे हे योगदान रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेविंग खात्यात खाते क्रमांक १६११००६०२२८२८, IFSC CODE IBKL0574RDC या खात्यात RTGS/NEFT द्वारा अगर धनादेशाचे माध्यमातून जमा करू शकता. आयकर कलम ८०G नुसारची सवलत प्राप्त करण्यास हे डोनेशन पात्र आहे. सर्वांनी यथोचित योगदान द्यावे, असे विनम्र आवाहन वाचनालयाचे वतीने ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 17/Jan/2025
