रत्नागिरी : काळबादेवी ते आरे-वारे या सुमारे चार किलोमिटरच्या टप्प्यातून सागरी महामार्ग नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काळबादेवी किनाऱ्यावरील मार्गाचे पोलिस बंदाबस्तात गुरुवारपासून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. या पट्ट्यातून रस्ता उभारण्यासाठी तिन पर्याय तयार केलेले होते. त्यापैकी ग्रामस्थांनी सुचवलेला किनाऱ्यावरील पर्याय निश्चित केला असून उर्वरित दोन पर्याय तात्पुरते रद्द केल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. हे सर्व्हेक्षण दोन आठवडे सुरू राहणार आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. काळबादेवी येथील खाडीवरील पूल बांधण्यात येणार आहे. त्याचा ठेकेदारही निश्चित झालेला आहे. पुढील रस्त्याबाबात एमएसआरडीसीतर्फे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली होती. काळबादेवी गावातून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवलेले होते. त्यामध्ये शेतजमिन आणि काही लोकांची घेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी काळबादेवी किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग न्या अशी सुचना केली होती. ग्रामस्थांनी सुचवलेला पर्याय निश्चित करून एमएसआरडीसीतर्फे आजपासून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. एमएसआरडीसीचे अधिकारी अजय झा यांनी आज सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी केली. हा मार्ग काळबादेवी किनाऱ्यावरील दर्ग्यापासून धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या बाजूने आरे-पुलापासून तिनशे मिटर आधी बाहेर पडणार आहे. पिलरवरून पुलाप्रमाणे रस्ता बांधण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच गावात उतरण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार आहे. हा मार्ग किती व्यवहार्य ठरेल, त्यावर पुढील भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
मार्ग सीआरझेड १ ए झोनमध्ये
किनाऱ्यावरून जाणारा हा मार्ग सीआरझेड १ ए या झोनमधून आणि वन विभागाच्या जागेतून जात आहे. त्यांची परवानगी घेण्यासाठी सीआरझेड आणि वन विभागाकडे प्रस्ताव सादर करताना पर्यायी आखणीबाबत सविस्तर अहवाल (Alternate Alignment Study Report) सादर करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने प्रस्तावित आखणीचे सविस्तर सर्व्हेक्षण केले जाणार आहे.
काळबादेवी येथील मार्गासाठी तीन अलायनमेंट निश्चित केल्या होत्या. मात्र त्यातील दोन अलायनमेंटना विरोध झाला होता. त्यानुसार तिसऱ्या पर्यायाच्या ठिकाणी सर्व्हेक्षण सुरू केलेले आहे. हे काम पूर्ण केल्यानंतर अहवाल तयार केला जाईल.– अजय झा, एमएसआरडीसी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 17-01-2025
