लांजा : पालू, चिंचुर्टी, हुंबरवणेसह पूर्व भागातील गावाची कोरड थांबणार!

लांजा : गेली अनेक वर्षांपासून लांजा तालुक्याचा पूर्व भाग पाणी टंचाईन ग्रासलेला असून पाण्यासाठी नागरिकांची दरवर्षी वणवण सुरू आहे. तीन कि.मी. पायपीट, तर कधी टैंकर, कधी खासगी वाहनांद्वारे विकत पाणी आणावे लागत होते. पालु परिसरातील गावांची पाण्यासाठी होणारी दमछाक आता पूर्णपणे थांबणार आहे. पालु चिंचुर्टी येथे मोठा धरण प्रकल्प किंवा पाझर तलाव बांधण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. अखेर ही मागणी पूर्णत्वाला गेली असून धरण क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या पालू पूर्व भागातील गावांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे.

लांजा तालुक्यातील पूर्व भागातील चिंचुर्टी, हुंबरवणे, पालू, कोचरी, केळवली, बोरीवले, हर्दखळे, हसोळ, गोबिळ या पूर्व गावांसाह पश्चिम भागातील काही गावांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी पाणी टंचाई उद्भवली नसली तरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांमध्येच सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पालू परिसरातील गावांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सध्या थंडी गायब असून कडाक्याच्या उन्हामुळे गर्मीत वाढ होऊ लागली आहे त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत. यावर्षी प्रशासनाने पाणी नियोजन, योजना राबविल्याने पाणी टंचाई थोडे प्रमाण कमी झाले आहे.

उभारण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पाच्या जागेचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. या धरणामध्ये २२४४.१५ दशलक्ष पाणीसाठा करण्याची क्षमता असून, १४७ हेक्टर जमीन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बंदीस्त कालाव्यांद्वारे पालू परिसरातही गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर पालू धरण प्रकल्प येत्या चार वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती लघु पाठबंधारे विभागाकडून देण्यात आली.

लांजा तालुका टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवार व जलस्वराज्य योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये २५ पेक्षा जास्त विहिरी बांधल्या आहेत. यासह बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईग्रस्त भागातील काही गावे ओलिताखाली आली आहेत. त्यामुळे गतवर्षपिक्षा यावर्षी पाणी टंचाईचे प्रमाण कमी झाले आहे. येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, डोंगराळ, दऱ्या- खोऱ्यातील गावातील पाणी प्रश्र डोकेदुखी ठरत आह

जनतेच्या आशा पल्लवीत
पालु, हुंबरवणे, चिंचुर्टी, धावडेवाडी या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी पालू परिसरात धरण, किंवा पाझर तलाव प्रकल्प राबवावा, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून केली आहे. अखेर या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाला असून, लघु पाटबंधारे धरण प्रकल्प पालु येथे सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन लांजा-राजापूर- साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले. त्यामुळे येथील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 20/Jan/2025