तंदुरुस्त आरोग्य हीच खरी धनसंपदा : जगदीश पाटील

राजापूर : कोरोनानंतरचा कालखंड हा गुंतागुंतीचा आणि धावपळीचा बनत चालला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असणारी विविध युद्धे, त्यातून मानवी हस्तक्षेपामुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल आणि मानवी व नैसर्गिक प्रदूषण, आपत्तीमुळे मानवी आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. अशा काळात तंदुरुस्त आरोग्य हीच खरी धनसंपदा असून, तरुणाईने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय रायपाटणचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जगदीश पाटील यांनी केले.

श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्ष आयोजित रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, समुदाय आरोग्य अधिकारी समृद्धो जाधव, फ्लेबॉट्रोमिस्ट स्वप्नाली जाधव, आरोग्य सेविका संपदा किनरे, आरोग्य सेवक एस. एस. झोरे, महिला विकास कक्ष सदस्या प्रा. एस. जी. चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बी.टी. दाभाडे, प्रा. एस. एस. धोंगडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा. एस. जी. चव्हाण यांनी हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणीचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याप्रती सजग राहून आपली काळजी स्वतःच घ्यावी व अशा शिबिरात स्वतःबरोबरच समाजातील इतर घटकांनाही समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रभारी प्राचार्य डॉ.पी. एस. मेश्राम यांनी केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शंभरहून अधिक मुला मुलींचे रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन प्राची पडवळ हिने तर आभार सायली गुरव हिने मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 20/Jan/2025