रत्नागिरी : मिरकरवाडा मच्छीमार्केट बाहेर बसलेल्या विक्रत्यांना पोलिस बंदोबस्तात बसविले मार्केटमध्ये; शिस्त मोडल्यास कारवाई

रत्नागिरी : मिरकरवाडा मच्छी मार्केटच्या बाहेर आणि मागे बसणाऱ्या मत्स्य विक्रेत्यांना मत्स्य विभागाने शिस्त लावली. काल पोलिस बंदोबस्तात मार्केट बाहेर बसलेल्या विक्रत्यांना मार्केटमध्ये बसविले. यापुढे जर बाहेर बसून शिस्त मोडली, मासळीचा कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी सोडून आरोग्याला बाधा पोहोचेल, असे काही केले तर कारवाई करण्याचा इशारा मलय विभागाने दिला,

मत्स्य विभागाने मिरकरवाडा बंदरामध्ये सुमारे एक कोटी खर्च करून मच्छी मार्केट बांधले आहे. त्यानंतर तिथे लाईट, पाणी, आदींसाठी सुमारे २५ लाख खर्च केले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजनमधून हा निधी देण्यात आला.

मिरकवराडा बंदरामध्ये घाणीचे साम्राज्य असलेल्या जेटीवरच मासे विक्री होत होती. यामुळे नाक मुरडत खवय्ये तेथे मासळी खरेदी करीत होते. खवय्यांना चांगल्या पद्धतीने मासळी खरेदी करता यावी, यासाठी मार्केट बांधले; परंतु विक्रेते त्यातूनही पळवाट शोधत बेशिस्तपणे मार्केटच्या बाहेर आणि मागे विक्री करू लागले. त्याची दखल मत्स्य विभागाने घेतली असून, बेशिस्त विक्रेत्यांना शिस्त लावली.

मार्केटमध्ये ७० ओटे बांधण्यात आले. सुरुवातीला मत्स्य विक्रेते तिथे बसले; परंतु कालांतराने पुढच्या भागात असलेल्या ओट्यांना चांगला प्रतिसाद मिळतो, आतल्या बाजूला असलेल्या ओट्यांकडे ग्राहक येत नाहीत, असा समज करून विक्रेते मार्केट सोडून बाहेर बसू लागले. त्यामुळे मार्केट ओस पडले. रस्त्यावर बसल्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यानंतर मत्स्य विभागाने पोलिस बंदोबस्तात त्यांना मार्केटमध्ये बसविले.

Infigo Eyecare

काही दिवसांपासून हेच मत्स्य विक्रेते मार्केटच्या मागे बसू लागले. यामुळे त्या भागात मासळीच्या पाण्यामुळे चिखल होत होता. मासळीची घाण तिथेच टाकली जात होती. हा परिसर अतिशय दुर्गंधीयुक्त झाला. मत्स्य विभागाने आज पोलिस बंदोबस्त घेऊन बेशिस्त विक्रत्यांना जबरदस्तीने मच्छी मार्केटमध्ये बसवून शिस्त लावली. बेशिस्त मासळी विक्रीमुळे मिरकरवाडा बंदरामध्ये घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे मार्केटच्या बाहेर बसू नये, असा दम विक्रत्यांना भरला आहे.

मच्छीमारांच्या सोयीसाठी मार्केट आणि खवय्यांना चांगल्या ठिकाणी मासळी खरेदी करता यावी या उद्देशाने मार्केट बांधले; परंतु बेशिस्त विक्रत्यांमुळे हा उद्देश बाजूला पडत होता. पोलिस बंदोबस्तात आज आम्ही शिस्त लावली यापुढे बेशिस्त विक्रत्यांवर कारवाई केली जाईल. – आनंद पालव, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 21/Jan/2025