मुंबई: “पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील पराभव ही देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. सत्ताधारी भाजपला देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. हीच भूमिका असेल, तर यापुढे विरोधी पक्षांनी निवडणुका लढवायलाच नकोत,” असा तीव्र संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. देशातील सध्याची निवडणूक पद्धती रशिया आणि पाकिस्तानसारखी होत चालल्याचा गंभीर आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला.
“अशा निवडणुका रशिया आणि पाकिस्तानात होतात”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवडणूक रणनीतीवर तोफ डागत संजय राऊत म्हणाले, “भारतामध्ये लोकशाही संपत चालली आहे. रशियात पुतिन यांच्या काळात जशा निवडणुका होतात, तशाच आता भारतात होताना दिसत आहेत. मी स्वतः अझरबैजानमध्ये निकालाच्या आधीच निकाल जाहीर होताना पाहिले आहे, भारतातही तीच परिस्थिती निर्माण होत आहे.”
निवडणूक आयोगावर थेट आरोप करताना राऊत म्हणाले की, राज्याराज्यांत लाखो मतदारांची नावे कापून संख्या कमी केली जाते आणि विजय मिळवला जातो. या पापात निवडणूक आयोगही सहभागी असून, विजयानंतर हे लोक लोकशाहीच्या छातीवर नाचतात, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
“मोदी सरकार ३६५ दिवस फक्त निवडणुकांची प्रॅक्टिस करते”
देशातील बेरोजगारी, विकास आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.
- विकासाचे प्रश्न दुर्लक्षित: “पंतप्रधान, गृहमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ३६५ दिवस फक्त निवडणुका कशा लढायच्या आणि जिंकायच्या, याच तयारीत व्यस्त असते. देशातील विकास, रोजगार आणि सुरक्षेचे प्रश्न त्यांच्या खिजगणतीतही नाहीत,” असे राऊत म्हणाले.
- सत्तेचा गैरवापर: “जगात एवढ्या मोठ्या घडामोडी सुरू असताना पंतप्रधान दोन महिने राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री २०-२० दिवस पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून राहतात. संपूर्ण सत्ता आणि पैशांचा गैरवापर केला जातो.”
‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य उज्ज्वल: “इंदिरा गांधी यांनीही एका काळात देशातील सर्व राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती, मात्र त्यानंतर त्यांचा पराभव झाला. मोदी आज त्याच सर्वोच्च टोकावर आहेत. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचा पराभव ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते, हे हिंदुत्वाचे शास्त्र आहे आणि हे मी भाजपला सांगत आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.
शेअर बाजार घसरल्यावरून टोला
“भाजपने आतातरी खरे बोलण्याचे धडे घेतले पाहिजेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रुपया आणि शेअर बाजार घसरला आहे,” असा टोला लगावत राऊतांनी आर्थिक स्थितीवरूनही सरकारला घेरले. देशात लोकशाही राहिली नसली तरी केवळ लोकशाहीच्या नावाने हे निकाल स्वीकारावे लागतात आणि पुन्हा उभे राहावे लागते, असे स्पष्ट करत त्यांनी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे भवितव्य अतिशय चांगले असल्याचे आवर्जून सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 05-05-2026














