राजापूर: जैतापूर-हातीवले रोडवर वळणावर दुचाकी मोरीला धडकली; २४ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर: राजापूर तालुक्यातील जैतापूर-हातीवले रोडवर पडवे स्टॉपजवळ एक अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्त्यातील तीव्र वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीला (छोटा पूल) जाऊन धडकली. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

वळणावर ताबा सुटला अन् थेट मोरीखाली कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कृष्णा पुजारी हा तरुण आपल्या पल्सर मोटारसायकलने (क्रमांक MH 05 FN 1728) जैतापूरकडून हातीवलेच्या दिशेने जात होता. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तो पडवे स्टॉपजवळ आला असता, एका तीव्र वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. अतिवेगात असलेली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सिमेंटच्या मोरीला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की, गौरव गाडीसह मोरीखाली असलेल्या खोल खडकाळ भागात कोसळला.

पोलीस पाटीलांमुळे घटना उघडकीस

साखर गावचे पोलीस पाटील रोहीदास गोविंद कांबळी (वय ५३) हे सकाळी एका लग्नासाठी जात असताना त्यांना पडवे स्टॉपजवळ गर्दी आणि अपघात झालेली दुचाकी दिसून आली. त्यांनी तातडीने गाडी थांबवून पाहिले असता हा भीषण प्रकार उघडकीस आला. पोलीस पाटील कांबळी यांनी विलंब न करता या अपघाताची माहिती राजापूर पोलीस ठाण्याला दिली. मात्र, खोल खडकावर कोसळल्याने डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे गौरवचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

मृत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल

या अपघातानंतर राजापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, गौरव पुजारी याने आपली मोटारसायकल अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ आणि मोटार वाहन कायद्यानुसार खालील कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:

  • BNS कलम १०६: निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणे (Causing death by negligence).
  • BNS कलम १२५: स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात आणणे.
  • कलम १८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४: धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे (Dangerous driving).

भरजवानीत एका तरुण दुचाकीस्वाराचा अशा भीषण अपघातात अंत झाल्यामुळे पडवे आणि जैतापूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालकांना वळणावर गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 05-05-2026