समाजात संविधानिक मूल्यांचा परिपोष व्हायला हवा : अरुण कदम

चिपळूण : भारतीय समाज हा विविध कारणांनी विघटित असलेला समाज आहे. अशा समाजाला एकसंध बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केलेले आहे. या संविधानातील मूल्यांचा जागर सतत व्हायला हवा, समाजात संविधानिक मूल्यांचा परिपोष करायला हवा, असे प्रतिपादन नाट्यदिग्दर्शक व अभ्यासक अरुण कदम यांना येथे केले.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने तिसरी सम्यक साहित्य कला संगीती महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आली. त्या संगीतीमध्ये ‘ भारतीय संविधान व बौद्ध धम्म ‘ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ग. वि. सहस्त्रबुद्धे मंचावर यावेळी संविधानाचे अभ्यासक व शिक्षक नूरखान पठाण व इंजिनियर अनिल जाधव या दोन मान्यवरांनी विषयावर मांडणी केली.

अरुण कदम पुढे म्हणाले, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत मांडण्यात आलेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नसून ती मूल्य गौतम बुद्धांच्या धम्मातून घेतले असल्याचे नमूद केले. भारतीय समाजात समता प्रस्थापित होण्यासाठी बौद्ध धम्माचे योगदान महत्त्वाचे आहे. बौद्ध धम्मातील मूल्य ही संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नमूद आहेत, त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे, असे सांगितले.

संविधान अभ्यासक नूरखान पठाण यांनी आपल्या विषयाची मांडणी करताना अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले, भारतीय संविधान म्हणजे एक प्रकारे बौद्ध धम्माचे एक वेगळे प्रारूप आहे. या धम्मातील तत्त्वांचा स्वीकार संविधानाच्या रूपातून सर्वांसाठी करण्यात आलेला आहे. भारतीय समाजाच्या विकासासाठी संविधानिक तत्त्व आणि मूल्य यांचा अंगीकार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संविधानासमोरील संभाव्य धोके लक्षात घेता लोकांनी सजग राहावे, असे सांगितले.

इंजिनीयर अनिल जाधव यांनी मांडणी करताना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वापरले पाहिजे, असे सांगून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातून अनेकदा या अधिकारांचे उल्लंघन होताना दिसते. आपला अधिकार वापरताना दुसऱ्यांच्या हक्कावर गदा येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच तथागत बुद्धाने सांगितलेला समतेचा विचार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मार्क्सने सांगितलेला विचार या दोन्ही विचारात काही लोक अंतरविरोध निर्माण करतात. तो खरे तर करता कामा नये . मार्क्सच्या कितीतरी वर्षे अगोदर बुद्धाने संपूर्ण मानवी कल्याणाचा विचार सांगितला आहे असे नमूद केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर आभार धीरज साळवी यांनी मानले.

तदनंतर शाहीर कुंदन कांबळे काव्य मंचावर कवी प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, सरिता पवार, कल्पना मलये, स्नेहा कदम, रजनी जाधव , डॉ. संजय खैरे , मारुती सकपाळ, विश्वास पवार, सुनील हेतकर, राजेश कदम ,अनिल जाधव, राजेंद्र कदम ,अरुण नाईक, किशोर कासारे ,संदेश पवार ,राष्ट्रपाल सावंत, संजय गमरे, सुनील जाधव ,भावेश लोखंडे, अशोक चाफे, अरुण कदम, आणि दीपेश जाधव सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी तर आभार प्रदर्शन गीतांजली साळवी यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 21-01-2025