मंडणगड : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवेमध्ये मागील काही वर्ष प्रलंबित असलेली केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना संसद आदर्श ग्राम पुन्हा नव्याने कार्यान्वित होण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी खासदार अमर साबळे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली आहे. बैठकीत आंबडवे गावाचा या योजनेच्या माध्मादल विशेष बाच म्हणून सर्वांगीण विकासासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
या योजनेसंदर्भात राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी आंबडवे येथे तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह दौरा केला. यानंतर आंबडवेतील स्मारक येथे योजनेच्या अमंलबजावणीसंदर्भात तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा व ग्रामस्थांच्या सूचना यावर आढावा बैठक घेतली, बैठकीत पद्मश्री दादा इदाते, माजी खासदार अमर साबळे, तहसीलदार अक्षय वाकणे उपस्थित होते.
मध्यंतरीच्या काळात तहसील, समाजकल्याण विभाग, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या बैठका, आराखडे या संदर्भात हालचाली सुरू होत्या; मात्र त्यास विशेष गती येत नव्हती, साबळे यांनी सोमवारी तालुक्यास भेट दिल्यानंतर यासंबंधी विभागांचा आढावा घेतल्यानंतर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
दहा वर्षांपूर्वी योजनेत समावेश
संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये आंबडवेचा २०१४-१५ ला विशेष बाब म्हणून समावेश करण्यात आला. तत्कालीन राज्यसभेचे खासदार साबळे यांनी विकासाच्यादृष्टीने आंबडवे गाव दत्तक घेतले. या योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधून आंबडवे गावाची ओळख जगाच्या नकाशावर आणण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या सहभागाने कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. त्यातील आंबडवे-राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे; मात्र महामार्गाचे काम व अन्य एखादे विकासकाम वगळता इतर कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 22/Jan/2025














