राजापूर : शहराला भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. टंचाईकाळात उपयुक्त ठरावे यासाठी पाणीसाठा टिकून राहावा म्हणून कोदवली नदीवर विविध ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाईची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे. तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस पडूनही आतापासूनच नद्यांची पात्रं कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे याववर्षी लवकरच पाणीटंचाईची झळ पोहोचण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. शहरातील संभाव्य पाणीटंचाई ओळखून त्याला सामोरे जाण्यासाठी नगरपालिकेने आतापासूनच नियोजन केले आहे. टंचाईच्या काळात उपयोगी ठरण्यासाठी कोदवली नदीवर ठिकठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. जवाहर चौक पुलालगत धोबीघाट, वासुकाका जोशी पुलानजीक, कोदवली धरणाजवळ असे बंधारे बांधण्यात आले आहेत. अद्यापही आणखीन काही बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
बंधऱ्यांमध्ये मुबलक पाणी
नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला असून, हा पाणीसाठा टंचाईच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. कोदवली येथील सायबाच्या धरणात मुबलक पाणी आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांमध्ये शहराला पाणीटंचाई भासली तरी त्याची तीव्रता कमी राहील, असा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 23/Jan/2025














