रत्नागिरी : गोडाऊन स्टॉप ते राधाकृष्ण नाका असा रिक्षाने प्रवास करताना रनपार येथे राहणारे सुहास भार्गव सुर्वे व त्यांच्या पत्नीची पैशाची आणि सोन्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी रिक्षात राहिली. सुर्वे दांपत्य श्री राधाकृष्ण मंदिर येथे खरेदीसाठी रिक्षातून उतरले. मात्र रिक्षा सोडून दिल्यावर आपल्याजवळील पिशवी रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी ते रत्नागिरी बाजारपेठेत आले होते. रिक्षात विसरलेल्या पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम होती. पिशवी रिक्षात विसरल्याचे लक्षात येताच सुर्वे दांपत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. हि रिक्षा धनाजी नाक्याच्या दिशेने गेली होती, म्हणून या रिक्षेचा शोध घेत हे दांपत्य धनजी नाका येथे गेले असता त्यांची भेट जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अजय मोहिते यांच्याशी झाली.
रडत रडत हे दांपत्य पिशवी हरवल्याचे सांगू लागताच मोहिते यांनी त्यांना धीर देत मी तुमची पिशवी शोधून देतो असे सांगितले. यावेळी अजय मोहिते हे ड्युटीवर देखील नव्हते, मात्र तरीदेखील त्यांनी श्री राधाकृष्ण मंदिर येथील सीसीटीव्ही फुटेज पाहून रिक्षाचा शोध घेत हही हरवलेली दागिन्यांची पिशवी आणि रोख रक्कम शिधून दिली. पिशवी हरवल्यावर ज्या राधाकृष्ण मंदिरात सुर्वे दांपत्याने पिशवी मिळण्यासाठी प्रार्थना केली त्याच राधाकृष्ण मंदिरात मंदिर पदाधिकाऱ्यांचे समक्ष अजय मोहिते यांनी हि पिशवी सुर्वे दांपत्याला परत केली. ड्युटीवर नसताना देखील जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अजय मोहिते यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सुर्वे यांनी त्यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 23-01-2025














