आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणाऱ्या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणारा नराधम सुनील रामा कूचकोरवी (वय ३५, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली.

न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपीचा अर्ज फेटाळून हा गुन्हा दुर्मिळ आणि अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवले. मंगळवारी (दि. १) हा निर्णय देण्यात आला.

माकडवाला वसाहत येथे २८ ऑगस्ट २०१७ मध्ये सुनील कूचकोरवी याने आई यल्लाव्वा रामा कूचकोरवी (वय ६३) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकूने तिचे पोट फाडून काळीज आणि इतर अवयव काढून ते भाजून खाल्ले. हा घृणास्पद आणि कीळसवाणा प्रकार उघडकीस येताच शाहूपुरी पोलिसांनी सुनील याला अटक केली होती.

तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायालयाने ८ जुलै २०२१ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्याला आव्हान देत शिक्षेत सवलत मिळण्यासाठी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायाधीश मोहिते-डेरे आणि चव्हाण यांनी आरोपीचा अर्ज फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

जेलमध्येही तो असे करेल..

आरोपीने केलेला गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्याने केवळ आईचा खून केला नाही, तर तिचे अवयव काढून भाजून खाल्ले. तो जेलमध्येही असे करेल. त्यामुळे त्याला फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

तपास अधिका-यांचे कौतुक

तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे, अंमलदार तानाजी चौगुले, सुरेश परीट, सागर माळवे, लक्ष्मण लोहार, आदींच्या पथकाने तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसतानाही परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षी यावर आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली. निरीक्षक मोरे यांनी तपास केलेल्या २०१२ मधील मुंबईतील एका गुन्ह्यातही आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 01-10-2024