कुंभळे गावात देशी दारू जप्त, तर मंडणगड बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई
मंडणगड: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पोलिसांनी तालुक्यात विविध ठिकाणी धडक मोहीम राबवून दारूबंदी कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या मोहिमेदरम्यान विनापरवाना देशी दारू बाळगणाऱ्या एका इसमासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांततेचा भंग करणाऱ्या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि मद्यपींचे धाबे दणाणले आहेत.
कुंभळे गावात विनापरवाना देशी दारू जप्त; ६५ (ई) अन्वये गुन्हा
पहिली कारवाई १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुंभळे गावात करण्यात आली. येथील रहिवासी समीर सत्यवान गायकवाड (वय ३५, रा. कुंभळे, ता. मंडणगड) हा आपल्याकडे विनापरवाना विक्रीसाठी देशी दारू बाळगून असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून ७२० रुपये किमतीच्या, १८० मिलीच्या एकूण नऊ प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड बाजारपेठेत बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्यांवर कारवाई
दुसरी आणि तिसरी कारवाई मंडणगड बाजारपेठ परिसरामध्ये करण्यात आली. बाजारपेठेतील ‘दरीपकर देशी बार’समोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या योगेश परशुराम काप (वय ३६, रा. पालघर, ता. मंडणगड) याच्यावर सायंकाळी ७.५० वाजता पहिली कारवाई करण्यात आली. त्यानंतर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बाजारपेठेतीलच ‘पाट रोड’वरील ‘धकुली देशी बार’समोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणारा जिगर सूर्यकांत साळेकर (वय ४१, रा. शेनाळे, ता. मंडणगड) हा पोलिसांना आढळून आला. या दोन्ही मद्यपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांची मोहीम तीव्र; पुढील तपास सुरू
मंडणगड पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या तळीरामांविरोधात जिल्ह्यात मोठी आघाडी उघडली आहे. वरील तिन्ही प्रकरणांतील संशयितांवर योग्य ती कायदेशीर कलमे लावून गुन्हे नोंदवण्यात आले असून, या सर्व प्रकरणांचा पुढील अधिक तपास मंडणगड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:45 16-06-2026














