संगमेश्वर : शांततामय व संविधानिक मागनि आतापर्यंत निवेदन देऊन रस्ताकामाच्या अनुषंगाने काहीच हालचाली न झाल्याने संगमेश्वर येथील संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्ता नाही तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार, असा निर्णय घेतला आहे.
सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन आतापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडून असलेला व संगमेश्वर येथील संभाजीनगरकडे जाणारा अवघ्या पाचशे मीटर अंतराचा असलेला हा रस्ता लाल मातीचा कच्चा रस्ता असून, या रस्त्यावर मोठे खडे पडले आहेत. लहान-मोठे दगडधोंडे पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे पडलेल्या चरींनी या सर्वामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सुमारे पाचशेपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या संभाजीनगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे; मात्र वस्तीतील लोकांना तसेच वसतिगृहातील मुलांनी या एकमेव रस्त्याशिवाय अन्य पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे सहा दशकांपासून याच जीवघेण्या व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरून वाहनाने किवा पायी प्रवास करणेच नशिबी आहे. शाळेत जाणारी लहान मुले, रुग्ण, वयोवृद्ध यांचे तर या रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहेत.
गेल्या साठ वर्षांत अनेक सरकारे आली, अनेक राज्यकर्ते होऊन गेले; मात्र आजपर्यंत या सर्वांकडे पक्का रस्ता व्हावा यासाठी अर्ज विनंत्या करण्यात आल्या; परंतु या अर्ज आणि विनंत्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे आता येथील लोकांनी रस्ताप्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय झालेल्या बैठकीत घेतला. आता आश्वासन नको तर रस्ता हवा, रस्ता नाही तर मतदान नाही, असा इशारा येथील अशोक जाधव, कृष्णा भोई, आकाश जाधव आदीसह ग्रामस्थांनी दिला आहे.
निवडणुकीत नेते येतात धावत
एवढेच नव्हे तर या वस्तीत सुमारे ३५० मतदार असून, निवडणुका आल्या की, सर्वच पक्षांचे पुढारी आणि नेते या वस्तीकडे येतात. ही मते पदरात पाडून घेण्यासाठी रस्ताप्रश्न मार्गी लावू, असे गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ नुसते आश्वासनच पदरी पडत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:42 PM 01/Oct/2024