पश्‍चिम घाट संवेदनशील क्षेत्र: राजापूर करकमधील ग्रामस्थांनी घेतली हरकत

राजापूर : पश्‍चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात (इकोसेन्सेटिव्ह झोन) समाविष्ट होण्यास करक गावाने विरोध दर्शवला आहे. तसा ठराव ग्रामसभेत केल्याची माहिती करकचे सरपंच सुरेश ऐनारकर यांनी दिली. हरकतीच्या ठरावासह गावातील तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी शासनाच्या वेबसाईटवरही हरकती नोंदवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्‍चिम घाटातील वनसंपदेचे जतन आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयातर्फे पश्‍चिम घाटातील काही क्षेत्र पर्यावरण संवेदनशील झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील करकसह ५१ गावांचा समावेश आहे. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत शासनाने लोकांकडून हरकती मागवल्या आहेत. त्याप्रमाणे करक येथील ग्रामपंचायतीसह तिनशेहून अधिक लोकांनी आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. इकोसेन्सेटिव्ह झोनमुळे भविष्यात गावात नवीन घरे बांधणे, उपजीविकेसाठी उद्योग उभारणे यासाठी कोणत्याही प्रकारचे बांधकाम वा घरबांधणी करण्यासाठी वनविभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसे झाल्यास त्यावर हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. या झोनमुळे गावातील अनेक कृतींवर शासन प्रतिबंध करणार असल्याने त्या द्वारे गावचा विकास पूर्णपणे खुंटणार आहे. त्याचवेळी इकोसेन्सेटिव्ह झोनमुळे जंगलातील प्राणी गावात आणि गावातील माणसे शहराकडे वळतील. त्याचे परिणाम होऊन वाढत्या लोकसंख्येने शहरे बकाल आणि गावे ओस पडतील. गावामध्ये उभारलेल्या अर्जुना धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचा राजापूर आणि लांजा तालुक्यातील गावांमधील लोकांना शेतीसाठी उपयोग होऊन लोकांना शेती करून उदरनिर्वाह करता येणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्‍यांनी प्रकल्पासाठी जागा दिल्या आहेत. शेतीव्यतिरिक्त उर्वरित जमीन व पर्यावरणपूरक साधनसंपत्तीचा उपयोग करतही उदरनिर्वाह करणे शक्य होणार आहे. गावच्या साधनसंपत्तीचा उपयोग करत लघुद्योगांची निर्मिती करून आर्थिक सुबत्ता साधणे शक्य होणार आहे; मात्र, पर्यावरण संवेदनशील झोन लागू झाल्यास या साऱ्याला पायबंद बसणार आहे. अशा प्रकारच्या विविध १३ मुद्द्यांन्वये आक्षेप ग्रामसभेच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

करक गाव शासनाने इकोसेन्सेटिव्ह म्हणून घोषित केले; मात्र त्या संबंधित कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे व मार्गदर्शन गावातील लोकांना केलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. ठरावाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. – सुरेश ऐनारकर, सरपंच

विशेष फंडाची तरतूद करा
पर्यावरण संवेदनशील झोनमध्ये करकचा समावेश करून संपूर्ण गावात सरसकट पर्यावरण संवेदनशील झोन लागू करू नये त्या ऐवजी शासनाने आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये पाठवून दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करावा. त्याबाबतची सविस्तर माहिती संकलित करत दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करावे. त्यासाठी विशेष फंडाची तरतूद करावी, अशी सूचनाही करक येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे शासनाला सूचित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 01-10-2024