रत्नागिरी : निवेंडीतील भूसंपादन शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर जाहीर करण्याचे मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी येथे मँगोपार्क उभारण्यासाठी एमआयडीसीकडून जागांचे भूसंपादन करण्यात येत आहे. या जागांची नाममात्र दरात शासनाकडून खरेदी केली जाण्याची भीती जागा मालकांना असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेण्यापूर्वी जागेचा दर जाहीर करण्यात यावा, अशी मागणी निवेंडी येथील भूसंपादीत शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन या शेतकऱ्यांनी गुरुवारी प्रांताधिकारी जीवन देसाई यांना दिले.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात निवेंडी येथे मँगो पार्क आणि दापोलीत फिशपार्कची घोषणा केली होती. त्यानंतर रत्नागिरीतील निवेंडीमध्ये या मँगो पार्कसाठी जागाही निश्चित करण्यात आली. सध्या या जागांचे भूसंपादन सुरु करण्यात आले आहे. त्यातच काही लोक गरीब शेतकऱ्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून जागा खरेदी करीत आहेत. त्यामुळे शासनाकडून दर जाहीर झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, अशी मागणीही शेतकऱ्यांची आहे.

गुरुवारी निवेंडी येथील शेतकरी दिलीप जोशी, अजय शिरगावकर, शाम आग्रे, विश्वनाथ बळकटे, शशिकांत देसाई, सहदेव भुते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी जीवन देसाई यांची भेट घेऊन स्थानिक शेतकऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी केली. यावर प्रांताधिकाऱ्यांनी लवकरच दर जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 31/Jan/2025