रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मासेमारी बंदर असलेल्या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटविल्यानंतर या बंदराचा कर्नाटकातील मलपी बंदराप्रमाणे विकास होणार आहे. त्याअनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील ११३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये १५० मीटरची लाटरोधक भिंत बांधणे, नौकांच्या मार्गातील गाळ काढणे, लिलावगृह, जाळे विणण्याच्या शेड, निवारा शेड, धक्का व जेटी दुरुस्ती, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, आग प्रतिबंधक उपाययोजना आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.
प्राधिकरणाने या माहितीला दुजोरा दिला. मिरकरवाडा बंदराच्या २५ हेक्टर जागेवर गेली कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामे होती. यापूर्वी तीन कारवाया करून देखील पुन्हा पुन्हा ही अनधिकृत बांधकामे उभी रहात होती. त्यामुळे मिरकरवाडा बंदराचा विकास गेली अनेक वर्षे रखडला होता. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौरा केल्यानंतर वस्तूस्थिती पाहून वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेली सर्व बांधकामे त्वरित हटवा, असे आदेश दिले. त्यानुसार मत्स्य विभागाने अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे केला. सुमारे ३१९ अनधिकृत बांधकामे असल्याचे दिसून आले होते. त्यांना नोटिसा देऊन स्वतःहून बांधकाम हटविण्यास सांगितले. त्यानंतर काही लोकांनी हटविले, परंतु उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.
पाडलेल्या बांधकामांचा मलबा गेले दोन दिवस हटविण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामामध्ये गुदमरलेल्या मिरकरवाडा बंदराने मोकळा श्वास घेतला. आता या बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी दिडशे मीटरने वाढविणे, उत्तरेकडे ६७५ मीटर लांबीची लाटरोधक भिंत बांधणे, नौकानयन मार्गातील गाळ काढणे आणि भराव व सपाटीकरण करणे, लिलावगृह, जाळे विणण्यासाठी दोन शेड बांधणे, मच्छीमारांसाठी दोन निवारा शेड बांधणे, पूर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासीत करणे, मच्छीमारांसाठी दोन गिअर शेड, अस्तित्वातील धक्का व जेट्टी दुरुस्त करणे, रेडियो कम्युनिकेशन सेंटर, बगीचा तयार करणे या कामाचा यात समावेश आहे. मिरकरवाडा टप्पा १ मध्ये ७४ कोटी रुपये मंजूर झाले होते. यामध्ये मत्स्यबंदराच्या पश्चिमेकडील अस्तित्वात असलेल्या १५० मीटर लांबीच्या ब्रेकवॉटरचे काम पूर्ण करण्यात आले. उत्तरेकडील ६७५ मीटर लांबीच्या नवीन ब्रेकवॉटरचे काम पूर्ण झाले. टॉप काँक्रिटचे काम बाकी आहे. मच्छीमारांना बोटींच्या मार्गावरील व जेट्टीच्या बाजूचा २ लाख ६७ हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आलेला आहे. यात टप्पा २ साठी ११३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मिरकरवाडा टप्पा दोनसाठी तरतूद
मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ अनधिकृत बांधकामे दोन दिवसांपूर्वी हटवण्यात आली. यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये वरील कामांसह अस्तित्वातील आवार भिंत दुरुस्त करणे, आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, पाणीपुरवठा करणे, विद्युतपुरवठा व विद्युतीकरण करणे ही विकास कामे घेतली जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 31/Jan/2025
