रत्नागिरी : ‘इपिजिनिया’ कुळातील नवी प्रजात देवरुख येथील सड्यांवर आढळून आली असून, त्या प्रजातीचे नामकरण ‘इपिजिनिया देवस्खेन्सिस (Iphigenia devrukhensis) असे केले आहे. पावसाळ्यात कातळावर फुलणारी ही प्रजात जगात केवळ देवरुखच्या सड्यांवर असल्याने इथल्या सड्यांच्या संवर्धनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी सांगितले. कॉलचीकेसी या वनस्पतींच्या गटातील ‘इपिजिनिया’ या कुळात भारतात सात प्रजाती आढळतात. त्यामधील पाच प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात.
यामध्ये आता एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील प्रताप नाईकवडे आणि प्रतीक मोरे यांनी ‘इपिजिनिया देवरुखेन्सिस’ या प्रजातीचा शोध लावला आहे.
ही प्रजात देवरुखातील साडवली आणि आंबिवलीच्या सड्यावर पावसाळी हंगामात फुलते. जून ते सप्टेंबर या काळात ती आपल्याला या दोन सड्यांवर दिसून येते. या वनस्पतीवर गुलाबी रंगाची फुले फुलतात. या प्रजातीला मराठीत भूईचक्र म्हटले जाते. इपिजिनीया रत्नागिरिका ही प्रजात या नव्या प्रजातीशी साध्यर्म असणारी आहे. कोकण दीपकाडी या प्रजातीचा अभ्यास करताना मोरे आणि नाईकवडे यांनी या नव्या प्रजातीचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना देवरुखमधील ‘इपिजिनिया’चे काही भाग हे ‘इपिचिनिया रत्नागिरीका’ प्रजातीपेक्षा वेगळे जाणवले. सूक्ष्म निरीक्षणाअंती देवरुखमधील ‘इपिजिनिया’ नवीन असण्यावर शिक्कामोर्तब झाले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावातील पहिले अक्षर घेऊन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून वनस्पतीच्या प्रजातीला ‘देवरुखेन्सिस’ हे नाव देण्यात आले आहे.
कंद लहान व पानांची संख्या कमी
फुलातील अंडाशय हा थोडा गोलाकार आहे. फुलातील पुंकेसरातील वृंत हे परागकोषापेक्षा जास्त लांब आहेत. नव्या प्रजातीच्या फुलांच्या देठांची लांबी कमी आहे तसेच जमिनीतील कंद हा लहान आकाराचा असून, पानांची संख्याही कमी आहे. या वैशिष्ट्यामुळे तसेच फरकामुळे देवरुख परिसरात आढळणारी प्रजात ही रत्नागिरिका प्रजातीपासून भिन्न आणि नवीन असल्याच निरीक्षणातून पुढे आले आहे.
‘इपिजिनिया रत्नागिरिका’पेक्षा वेगळी
रत्नागिरिका या प्रजातीमध्ये स्त्रीकेसरावरील कुक्षी ही सरळ एकेरी असते. नवीन प्रजातीत ती त्रिदलीय आहे. बियांचा आकार लहान आहे तसेच बियांची संख्या ही देखील रत्नागिरिका प्रजातीपेक्षा कमी आहे. वियांची रचनादेखील एका बाजूला चपटी आहे, असे मोरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 01/Mar/2025














