मुंबई-गोवा महामार्गाचे तीन टप्प्यांतील काम संथगतीने..

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. एकूण १२ टप्प्यात हा महामार्ग विकसित होत असून तीन टप्पे वगळता इतर ठिकाणचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे; मात्र या कासू ते इंदापूर, इंदापूर-वडपाले आणि आरवली- कांटे या तीन टप्प्यांतील काम रखडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे इतर ठिकाणचे काम पूर्ण झाले तरी या महामार्गावरील प्रवास वेगाने होण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत आहे. महामार्गाचे काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे अलीकडे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून (मॉर्थ) हा महामार्ग उभारण्यात येत आहे. एकूण ४३९.८८ किमीपैकी ८४.६० किमीचा (पनवेल ते इंदापूर) मार्ग ‘एनएचएआय ‘कडून दोन टप्प्यांत (पंकज) उभारण्यात येत आहे. उर्वरित ३५५.६० किमीचा मार्ग थेट मंत्रालयाकडून दहा टप्प्यांत बांधला जात आहे. बारा टप्प्यांपैकी चार टप्प्यांची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. हे चार टप्पे वगळल्यास उर्वरित आठ टप्प्यांची कामे सरासरी ८३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती ‘एनएचएआय’ व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.

या संपूर्ण महामार्गातील आव्हानात्मक असा भाग हा रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटाचा आहे. तो सद्य:स्थितीत ९४ टक्के पूर्ण झाला आहे. त्या आधी कशेडीजवळील भागही सरासरी ९७ टक्के पूर्ण झाला आहे. हे दोन्ही भाग रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून उभारले जात आहेत; मात्र कासू ते इंदापूर, इंदापूर ते वडपाले आणि आरवली ते कांटे या तीन टप्प्यांतील कामे संथगतीने सुरू आहेत.

त्यापैकी आरवली ते कांटे हे संगमेश्वर तालुक्यातील काम असून या टप्प्यातील पुलाची कामेही झालेली नाहीत. तसेच अनेक ठिकाणी अद्याप खोदकामही झालेले नाही. त्यामुळे येथील महामार्गाचे काम पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रवास खड्डे, चिखल आणि धुळीतूनच करावा लागणार आहे. वाकेड ते झारप (जि. सिंधुदुर्ग) पर्यतच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूकही सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:49 PM 31/Jan/2025