गणपतीपुळे येथे उद्या माघी यात्रा

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे उद्या शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेनिमित्ताने स्थानिक भाविकांचा जनसागर लोटणार आहे.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दरवर्षी माघी यात्रा ही स्थानिक भाविकांची म्हणून ओळखली जाते. त्यामुळे घाटमाथ्यावरील भाविकांपेक्षा या यात्रेला स्थानिकांची उपस्थिती मोठी असते. त्यामध्ये गणपतीपुळे तीर्थक्षेत्राबरोबर नजिकच्या मालगुंड, वरची निवेंडी, भगवतीनगर, वरवडे, नेवरे, भंडारपुळे, धामणसे खंडाळा व जाकादेवी, तसेच संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील व जिल्ह्यातील स्थानिक भाविक श्रींच्या दर्शनासाठी व यात्रेच्या खरेदी निमित्ताने हजेरी लावतात. या माघी यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक दुकानदार आपली विविध वस्तूंची दुकाने घेऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे माघी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनाबरोबरच विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे व जयगड पोलीस यंत्रणा यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तिन्ही यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

या माघी यात्रेच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने सायंकाळी ठीक चार वाजता मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या माघी यात्रे च्या निमित्ताने येणाऱ्या स्थानिक भाविकांनी संपूर्ण परिसरात फिरताना स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन आपल्या मौल्यवान वस्तू व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळे व ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 31/Jan/2025