रत्नागिरी : श्री पतित पावन मंदिर अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी उत्सवाचे ९६ वे वर्षे आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने दातृत्वभूषण कै.भागोजीशेे कीर यांनी बांधलेले आणि लोकार्पण केलेले श्री पतित पावन मंदिर हे रत्नागिरीतील सामाजिक समरसतेचे प्रतीक मानले जाते. दोन जन्मठेपेची शिक्षा भोगून परत आल्यानंतर ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केले. १९२४ ते १९३७ अशी तेरा वर्ष ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे बहुमोल कार्य हाती घेतले आणि या कार्याचा भाग म्हणूनच या मंदिराची स्थापना झाली .या मंदिरामध्ये सर्व हिंदू समाजाला गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करुन पूजा करण्याचा मान दिला जातो. भारतातीलच नव्हे तर जगामधील हे एकमेव मंदिर आहे. याच उत्सवामध्ये धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांना संधी मिळणे हाच या कार्यक्रमांचा उद्देश असतो.
३१ जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचे आगमन सवाद्य मिरवणुकीने होईल. गणेश चतुर्थीला म्हणजेच पहिल्या दिवशी सायंकाळी महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि संध्याकाळी कीर्तन आयोजित केले आहे. रात्री ९ वाजता मंदिराच्या प्रांगणात नव्यानेच उभारलेल्या सर्व सोयीने युक्त अशा भव्य रंगमंचाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे आणि मंडळाचे अध्यक्ष मंदार खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. हा भव्य रंगमंच मंडळाचे कार्यकर्ते मंदार खंडकर यांच्या प्रयत्नातूून साकार झाला आहे.
शुभारंभाचा प्रयोग म्हणून मंदिराच्या कार्यकर्त्या महिला आणि बालगोपाळ मंडळी यांचा मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा मागोवा घेणारा “लखलख चंदेरी” हा कार्यक्रम सादर होणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्या सौ. स्वाती शेंबेकर या असे विविधरंगी कार्यक्रम गेल्या अनेक वर्ष सादर करीत आहेत.
२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सहस्त्रावर्तने आणि दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता “होम मिनिस्टर “हा महिलांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता महाआरती होईल. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांचे भजन होईल. रात्री ९ वाजता “लव लग्न लोच्या” हे विनोदी नाटक सादर केले जाईल.
४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ये ७ यावेळेत महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता “कोण नाय कोनचा” हे विनोदी नाटक सादर केले जाईल. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वेळेत श्रीमान भजन मंडळ यांचे भजन होईल. त्यानंतर रात्री ९ वाजता सौ. दर्शना लोध – कामेरकर आणि विद्यार्थिनींचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. ६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले महिलांनी सादर केलेले गण व गवळणीसहित महिलांचे नमन सादर होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.
गेली अनेक वर्ष अखिल हिंदू गणेशोत्सवामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांकडून आणि गणेश भक्तांकडून उदंड आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याही वर्षी गणेशोत्सवामध्ये सादर होणाऱ्या सर्व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांना सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 31/Jan/2025
