नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी(31 जानेवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी द्रौपदी मुर्मूंना (Draupadi Murmu) ‘पुअर लेडी’ म्हटले.
यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाने पुन्हा काँग्रेसचे शाही राजघराणे पाहिले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत संबोधित केले. ओरिसातील एका गरीब कुटुंबातून त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही, उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले. पण काँग्रेसचच्या राजघराण्याने त्यांचा अपमान केला. राजघराण्यातील एका सदस्याने (राहुल गांधी) राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले. तर, आणखी एका सदस्याने (सोनिया गांधी) पुअर लेडी म्हटले.’
‘एका आदिवासी महिलेचे बोलणे काँग्रेसला कंटाळवाणे वाटते. हा देशातील 10 कोटी आदिवासी बांधवांचा अपमान आहे. काँग्रेस प्रत्येकवेळी गरीब, दलित आदिवासींचा अपमान करते. काँग्रेसला परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे आणि शहरी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे आवडते,’ अशी टीका पीएम मोदींनी यावेळी केली.
नड्डांचा काँग्रेसवर निशाणा
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सोनिया गांधींनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या टिप्पणीबाबत पोस्ट केली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी पुअर लेडी हा शब्दप्रयोग केला, ज्याचा मी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तीव्र निषेध करतो. अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केल्याने काँग्रेसचा गरीब विरोधी, आदिवासी विरोधी चेहरा दिसून येतो, अशी टीका भाजपाध्यक्षांनी केली. तसेच, काँग्रेसने राष्ट्रपती आणि आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेला धक्का’
राष्ट्रपती भवनाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे या सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या नेत्यांनी म्हटले की, (अभिभाषणाच्या शेवटी) राष्ट्रपती खूप थकल्या होत्या, त्यांना बोलता येत नव्हते. राष्ट्रपती कधीही थकल्या नाहीत. उलट, उपेक्षित समुदाय, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलण्यावर त्यांचा विश्वास आहे. अशाप्रकारच्या टिप्पण्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत.’
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 31-01-2025
