नववर्ष स्वागत ठेव योजनेला स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांचा दणदणीत प्रतिसाद; संस्थेच्या ठेवी ३४१ कोटी पल्याड पोचल्या, या ठेव योजनेत रुपये ११ कोटी ८६ लाख संकलित : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी दणदणीत प्रतिसाद देऊन संस्थेच्या एकूण ठेवी ३४१ कोटी १० लाख पल्याड पोचवल्या. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ अखेर पर्यंत ४४ कोटींच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या असून नववर्ष स्वागत ठेव योजनेच्या सांगते वेळी ११ कोटी ८६ लाखांच्या ठेवी नव्याने संस्थेकडे जमा झाल्या. ठेवीदारांचा हा प्रतिसाद सर्व १७ शाखांमध्ये जाणवला. १००० पेक्षा जास्त ठेव खाती या स्वागत ठेव योजनेत सुरू झाली असून संस्थेने घोषित केलेल्या सर्व ठेव योजनांमध्ये ठेवीदारांनी भरभरून ठेव जमा केली. संस्थेवरील ग्राहकांचा विश्वास आणि संस्थेबरोबरचे स्नेहमय नाते यांचे प्रत्यंतर ठेववृद्धीच्या प्रतिसादावरून सहज ताडता येते.

अर्थविश्वात प्रचंड कॅश क्रंच आहे असे सर्वत्र बोलले जात असताना एक महिन्यात संस्थेकडे ११ कोटी ८६ लाखांची गुंतवणूक होणे लक्षणीय आहे, असे मत ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त करत ठेवीदारांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद ऊर्जादायी असून ठेवीदारांचा विश्वास सार्थ ठरवत पुढील टप्पा गाठण्याचे नियोजन संस्था करेल व आर्थिक सेवांचे जाळे अधिक विस्तारीत करेल, असे, ॲड. पटवर्धन म्हणाले व सर्व ठेवीदार सभासदांना ॲड. पटवर्धन, अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
20:28 31-01-2025