Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती गोठवली; आदिती तटकरेंकडून यादी पोस्ट

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे.

तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 02-10-2024