राजापूर : महामार्गावरील शेडच्या उभारणीचे काम सुरू

राजापूर : निवाराशेडअभावी मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतीक्षेसाठी ऊन-पावसाच्या झळा सहन करत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. याबाबत आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून भाजपयुमोचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी शासनाकडे मुंबई-गोवा महामार्गावर पिकअप शेड उभाराव्यात, याची मागणी आणि सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा वा पिकअप् शेड मंजूर झाल्या आहेत. या शेडच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर उन्हा-पावसात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने केले जात आहे; मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यावर पिकअप शेड उभारण्यात आलेल्या नसल्याने प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतीक्षेसाठी ऊन-पावसाच्या झळा सहन करत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. लांजेकर यांनी शेड उभारणीसाठी उपोषणाचा इशाराही दिला होता. उन्हाळे गंगातीर्थ ग्रामस्थांसमवेत भाजपचे विधानसभाप्रमुख अभिजित गुरव आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्याला अखेर यश आले असून, महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा वा पिकअप शेड मंजूर झाल्या आहेत. महामार्गावरील ठिकठिकाणी पिकअप् शेड उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 05/Feb/2025

Arihant 2