राजापूर : ई-पॉस मशीनवर काम करताना सातत्याने सर्व्हेडाऊन होत आहे. त्यामुळे ऑनलाईन रेशनिंग धान्य वितरण करताना अडचणी येत आहेत. नेटवर्क अभावी ऑनलाईन पावती न होणे, कमिशन वाढ यांसह अन्य रास्त दर धान्य दुकानदार आणि शिधापत्रिकाधारकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत रास्त दर धान्य दुकानदार संघटनेचे राजापूरचे अध्यक्ष अॅड. महेश नकाशे आणि सहकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांना निवेदन दिले.
तालुक्यातील रास्त दर धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि रास्त दर धान्य दुकानदारांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार विकास गंबरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, अॅड. शशिकांत सुतार, योगेश नकाशे, ओंकार प्रभूदेसाई, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अॅड. नकाशे, सचिव दीपक जाधव आदी उपस्थित होते. धान्य दुकानदारांच्या समस्येबाबत चर्चा करताना आमदार सामंत यांनी सर्व समस्यांचे तत्काळ निवारण करण्याचे आश्वासन दिले.
आयुष्यमान भारत कार्डाचा लाभ मिळावा
आयुष्यमान भारत कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षभरामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत शासनातर्फे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात; मात्र रेशनिंग कार्ड अपडेट असूनही तालुक्यातील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा रास्त दर धान्य दुकानदार संघटनेकडून व्यक्त करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 07/Feb/2025
