senior citizen day| रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

◼️ लायन्स क्लब रत्नागिरीचा सक्रिय सहभाग

रत्नागिरी : मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर ला रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ज्येष्ठ senior citizen day नागरिक सभागृहात साजरा केला. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वयाची ७५, ८० , ८५ व ९० वर्षे पूर्ण झालेल्या तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सप्टेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमात रत्नागिरी लायन्स क्लबने सक्रिय सहभाग घेतला होता. लायन्स क्लब अध्यक्ष श्री गणेश धुरी यानी ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन माता पित्या समान असलेल्या ज्येष्ठांचे आशिर्वाद घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले. तसेच या पुढेही रत्नागिरी लायन्स क्लब जेष्ठ नागरिकां सोबत राहील असे सांगितले. संघाचे भूतपूर्व अध्यक्ष ज्येष्ठतम सदस्य डाॅ.श्रीरंग कद्रेकर यानी सर्व ज्येष्ठानी सदैव कार्यरत रहा आणि आपल्या मित्र परिवारा सोबत रहा तसेच नियंत्रीत आहार व झोप या बाबत दक्ष रहा असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धनंजय कुलकर्णी (एस पी) जिल्हा पोलीस अधीक्षक यानी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून रत्नागिरीतील ज्येष्ठांकडून आशिर्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल संघाचे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांचे सर्व प्रथम आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर आहे असे अभिवचन त्यानी दिले. दिवसा वा रात्री केव्हाही आवश्‍यक असलेल्या वेळी 112 क्रमांकावर फोन करा १५ मिनीटात नजिकच्या पोलीस स्थानकातून पोलीस अधिकारी आपल्या सेवेला हजर होईल असेही सांगितले. सध्याच्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या युगात अनेक प्रकारचे सायबर गुन्हे घडत आहेत आणि याला ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. मोबाईल वरील अपरिचितांशी संभाषण कटाक्षाने टाळा असे आवाहन केले.

अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यानी पोलीस यंत्रणेशी संबंधित विषयावर त्वरित कार्यवाही करण्याबाबत तसेच रत्नागिरी शहरातील विशेषतः एस टी स्टॅन्ड ते विठ्ठल मंदिर या रस्त्यांवरील राम आळी आणि मारूती आळीतील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांच्या सततच्या अतिक्रमणांचे उच्चाटन करून ज्येष्ठ नागरिकाना रस्त्यावरून निर्धोक चालण्यास सहकार्य करा अशी आग्रही मागणी श्री कुलकर्णी यांच्याकडे केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष डाॅ.विजयराव निंबाळकर यानी केले. सुत्र संचालन उपाध्यक्षा पद्मजा बापट यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्वच पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यानी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाला बहुसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 02-10-2024