तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी येथे दमण ते विझिंजाम सायकल रॅलीचे स्वागत

◼️ 49 व्या तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्रीय मुख्यालयाद्वारे तटरक्षक दलाच्या 49 व्या स्थापना दिनानिमित्त ‘सुदृढ निग्राणी सुरक्षित तट’ या संकल्पनेने प्रेरित तटरक्षक दलातील 20 सायकलस्वारांनी सहभाग घेतलेल्या दमण ते केरळमधील विझिंजाम पर्यंत अशा एकूण 1860 किमी लांबीच्या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या 2 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झालेल्या या रॅलीचे 07 फेब्रुवारी 2025 रोजी रत्नागिरी येथे तटरक्षक दलाच्या जवानांनी जल्लोषात स्वागत केले.

ही रॅली भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधिकार क्षेत्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामधील बाणकोट, दापोली, जयगड, विजयदुर्ग, देवगड आणि मालवण या किनारी भागातून मार्गक्रमण करत अंदाजे 350 किमी अंतर पार करणार आहे.

रत्नागिरीच्या मार्गावर, भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आणि सुदृढतेमध्ये सायकलिंगचे महत्त्व याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 07 फेब्रुवारी 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे मच्छीमार समुदायासोबत सायकलस्वार आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा संवाद कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. त्यानंतर रात्री सर्व सायकलस्वारांनी तटरक्षक रत्नागिरीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी युक्त ट्रूपस गेट टुगेदर मध्ये सहभाग घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी सर्वच सायकल्सचे आवश्कतेनुसार मेंटेनन्सचे आणि ऑईलिंगचे काम करण्यात आले.

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ही रॅली रत्नागिरी येथून 09 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी आपला प्रवास पुन्हा सुरू करेल आणि 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत केरळमधील विझिंजम येथे पोहचेपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुदायांशी संपर्क साधत त्यांना जागरूक करण्याचे आपले कार्य करेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 08-02-2025