संगमेश्वर : पूर्वी ग्रामीण भागातील शाळांमध्ये झाडे लावली जात; मात्र, दिवसेंदिवस शाळेमध्ये झाडे लावण्याच्या प्रमाणात घट होत असून, शाळेतील परिसर भकास होत आहे. ही परिस्थिती असतानाच असुर्डे मणवेवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळा परिसरात विविध प्रकारच्या भाज्या, फळ आणि फूलझाडांची लागवड केली आहे.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड केली आहे.
या भाजीपाल्याचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जात आहे. शुद्ध आणि गावरान भाजीपाला असल्याने ती विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आहे. त्यात कोणत्याही रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय खतांचा भाजीपाला लागवडीसाठी वापर केला आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत तसेच अनिल जाधव, विकास वाडकर आणि संदीप कुंभार यांनी सांगितले.
शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून सुमारे २७ विद्यार्थी पटसंख्या आहे. दुर्गम भाग आणि डोंगरावर असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावरोवरच प्रत्यक्ष कृतीतून दिलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरत आहे. त्यासाठी येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित कृतीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांना एकत्र करून विविध भाजीपाला लागवडीसाठी बियाणे तसेच तयार रोपे आणण्यात येते. टोमॅटो, चवळी, पावटा, गवार, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी आदी पालेभाज्यांची शाळेच्या आवारातच लागवड करून जमीन मशागतीपासून भाजी लागवड ते भाजी उगवल्यानंतर त्या काळेपर्यंत सर्व प्रक्रिया शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः करत आहेत. शाळेच्या आवारात पेरू, केळी, काजू, फणस, पपईची झाडे लावण्यात आली आहेत. केळी आणि पपईच्या झाडांना फळे लागली आहेत. गावठी केळी आणि पपई विद्यार्थ्यांना दिली जातात. शाळेच्या पटांगणात प्रवेश करताच विविध प्रकारची फूलझाडे पाहून मन आकर्षित होते. फुलांमधून येणार सुगंध, फुलपाखरांसह विविध पक्ष्यांचे दर्शनही होऊ लागले आहेत. ही परसबाग पाहून शिक्षणविस्तार अधिकारी त्रिभुवने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आरोग्यास लाभदायक
बाजारातील हायब्रीड भाजीपाला न आणता विद्यार्थ्यांनी परसबागेत फुलवला आहे. ताजा, टवटवीत भाजीपाला दररोज पोषण आहारात वापरला जात आहे. यामुळे साहजिकच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे शाळेचे शिक्षक सांगतात. या शाळेचा परसबागेचा उपक्रम आदर्श उदाहरण ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 11/Feb/2025














