सावंतवाडी: सध्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी नवीन तंत्राचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, एटीएम कार्ड, ऑनलाइन अॅप किंवा यूपीआय क्रमांक नसतानाही नागरिकांच्या खात्यातून सायबर ठकांनी पैसे काढल्याची घटना घडली आहे. डेगवे येथील नागेश पांडुरंग दळवी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.
नागेश दळवी व त्यांच्या आईचे संयुक्त खाते बांदा येथील बँक शाखेत आहे. २० ते २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यातून प्रत्येकी १० हजार रुपयांच्या पाच व्यवहारांद्वारे एकूण ५० हजार रुपये काढले गेले. विशेष बाब म्हणजे दळवी यांच्याकडे एटीएम कार्ड नाही व ते ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी कोणतेही ॲप वापरत नाहीत. तरीही त्यांचे खाते रिकामे झाले आहे. ही बाब दळवी यांना कळली तेव्हा ते आपल्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी बँकेत गेले होते. त्यांना हे कळताच त्यांनी तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात हे व्यवहार mumbai येथून केल्याचे उघड झाले आहे. ठकांनी आधारकार्ड व बायोमेट्रिक वापरून व्यवहार केले आहेत. मात्र, दळवी यांनी कोणालाही आधारकार्ड क्रमांक किंवा बायोमेट्रिक ठसा दिला नसल्याने या फसवणुकीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.