रत्नागिरी : मत्स्योद्योग अभियंत्यांकडून मिरकरवाडा बंदर परिसराची पाहणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरील विकासकामांच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळाच्या अभियंत्यांनी बंदरावरील परिसराची गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर आता येथील बांधकामांचा आराखडा आणि अंदाजपत्रक बनवली जाणार आहेत. मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर येथील अनधिकृत बांधकामे नुकतीच हटवण्यात आली आहेत. लगेचच ना. नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसायच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन या बंदरावरील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाच्या अभियंत्यांनी मिरकरवाडा बंदर परिसराला भेट देऊन पाहणी केली. तब्बल १०.८४ हेक्टर क्षेत्रात मत्स्य व्यवसायला चालना देणारे विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या संदर्भात अभियंत्यांनी बंदरावरील जागेची पाहणी केली. त्यानंतर लगेचच स्थापत्य बांधकामांसह त्या कामांच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 14/Feb/2025

Khabardar diwali fest