FDA Pune Market Yard Action: सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीआयची मोठी कारवाई

‘बी. जी. गोयल अँड कंपनी’वर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; ८ लाख रुपयांचा ४ हजार किलो साठा जप्त

पुणे: ‘FDA Pune Market Yard Action’ (पुणे मार्केट यार्ड अन्न व औषध प्रशासन कारवाई) अंतर्गत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी मार्केटयार्ड परिसरातील ‘बी. जी. गोयल अँड कंपनी’ या फर्मवर करण्यात आली असून, प्रशासनाने दुकानाचा परवाना व अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी ओढल्या आहेत.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी मार्केटयार्ड येथील या दुकानात अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी दुकानातील हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे विविध नमुने तपासणीसाठी जप्त केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि आवश्यक तरतुदींचे पालन न केल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या छाप्यादरम्यान अन्न व औषध प्रशासनाने लेबलमधील त्रुटी आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून तब्बल ४,००० किलोचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या विविध अन्नधान्य आणि मसाल्यांच्या साठ्याची एकूण किंमत अंदाजे ८ लाख रुपये इतकी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जप्त केलेले नमुने पुढील प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या कारवाईत केवळ मालाची जप्तीच करण्यात आली नाही, तर संबंधित व्यावसायिक संस्थेने आपल्या अन्न सुरक्षा परवान्यामध्ये आवश्यक त्या कायदेशीर दुरुस्त्या वेळेत केल्या नसल्याचे उघड झाले आहे. या गंभीर त्रुटीची दखल घेत एफडीएकडून गोयल यांना पुढील आदेश येईपर्यंत आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे.

मार्केटयार्ड सारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे आणि त्यातही शहर पातळीवर गाजलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाशी असलेल्या या दुकानाच्या संबंधामुळे व्यापारी वर्गात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. एफडीआयचे पथक या प्रकरणाचा आणि जप्त केलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा पुढील तपास करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 16-07-2026